मुंबई – जागतिक आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे जगभरातील रिझव्हर्र् बँकांनी सोने खरेदी वाढविली आहे. त्यातल्या त्यात भारतीय रिझर्व्ह बँक सोने खरेदीत आघाडीवर आहे. रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर महिन्यात 27 टन सोने खरेदी केले. तर जगातील सर्व रिझर्व बँकांनी एकूण 60 टन सोने खरेदी केले आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेने जारी केलेल्या माहितीनुसार रिझव्हर्र् बँकेने ऑक्टोबर महिन्यात 27 टन सोने खरेदी केल्यामुळे जानेवारीपासून रिझर्व्ह बँकेने एकूण 77 टन सोने खरेदी केले आहे. गेल्या वर्षी खरेदी केलेल्या सोन्यापेक्षा यावर्षी या कालावधीत खरेदी केलेले सोने पाचपट अधिक आहे.
यामुळे भारताकडे असलेला एकूण सोन्याचा साठा 882 टनांवर गेला आह. त्यातील 510 टन सोने भारतात ठेवण्यात आले आहे. तर उरलेले सोने इंग्लंडसह इतर ठिकाणी ठेवण्यात आले आहे. वेगाने विकसित होत असलेले देश जास्त सोने खरेदी करीत आहेत. तुर्कस्तानने यावर्षी आतापर्यंत 72 टन तर पोलंडने 69 टन सोने खरेदी केले आहे.
जागतिक पातळीवर अनेक युद्ध चालू आहेत. त्याचबरोबर जागतिक पातळीवरील महागाई वाढली आहे. आगामी काळातही परिस्थिती अनिश्चित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सर्वसामान्य गुंतवणूकदाराबरोबरच रिझर्व्ह बँका सोने खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे.
सोन्याच्या साठ्यामुळे संबंधित बँकांच्या देशातील चलन स्थिर राहण्यास मदत होते. त्याचबरोबर अतिरिक्त परकीय गंगाजळीचा योग्य वापर व्हावा यासाठीही रिझर्व्ह बँका सोने खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. रिझर्व्ह बँका सोने खरेदी करीत असल्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सोने महाग होताना दिसत आहे.