मुंबई- भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडील सोन्याचा साठा वाढून 794.64 टनावर गेला आहे. मार्च 2023 अखेरीस संपलेल्या वर्षात रिझर्व्ह बॅंकेकडील सोन्याचा साठा 34.22 टनाने वाढून 794.64 टनावर गेला असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या माहितीतून दिसून येते.
यातील 437 टन सोने बाहेर देशात सुरक्षित पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे. तर देशात 300 एक टन सोन्याचा साठा करण्यात आला आहे. आता भारताकडील एकूण परकीय चलन साठ्यात रिझर्व्ह बॅंकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या मूल्याचे प्रमाण 7.81 टक्क्यावर गेले आहे.
मार्चअखेरीस भारताकडे 578.45 अब्ज डॉलरचा सोन्याचा साठा असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने जारी केली होती. करोनानंतर भारताकडील परकीय चलन साठ्यात काही प्रमाणात घट झाली असली तरी हा साठा समाधानकारक पातळीवर आहे.
करोनानंतर भारताच्या रुपयाच्या मूल्यातही बरीच घट झाली आहे. त्यामुळे परकीय चलन संवर्धनासाठी रिझर्व्ह बॅंक वेळोवेळी आवश्यक त्या उपाययोजना करीत असते. त्याचा एक भाग म्हणून रिझर्व्ह बॅंकेने विविध देशाबरोबर रुपयाच्या माध्यमातून व्यापार करण्यास चालना दिली असून जवळजवळ अर्धा डझन देशांनी भारताबरोबर रुपयाच्या माध्यमातून व्यापार सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.