पुणे – महापालिकेने पुरेशा पाणीसाठ्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, तत्कालीन राज्य सरकारने पालिकेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. पालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांना अतिरिक्त पाणी मंजूर होणे आवश्यक होते. परंतु, अद्याप वाढीव पाणीसाठा शासनाने मंजूर केलेला नाही. त्यामुळे पुणेकरांना पाणी टंचाइची झळ बसत आहे.
पुण्याला २१ टीएमसी पाणीसाठा मंजूर करावा, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत केली आहे. पुणेकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार कोणत्या उपाय योजना करीत आहे, असा सवाल धंगेकर यांनी बुधवारी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला.
महापालिकेत समाविष्ट ३४ गावांसह पुणे शहराला पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पुण्याचा पाण्याचा प्रश्न अवघड होत आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट राहिले आहे. स्वच्छ पाणी नागरिकांना मिळत नाही. अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने रोगराई पसरत आहे. म्हणून समान पाणीपुरवठा योजनेकडे आणि शुद्ध पाणीपुरवठ्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, टँकर माफियावर नियंत्रण आणले पाहिजे. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे रोगराई वाढणार नाही हे पाहिले पाहिजे. मात्र, सरकार पावले उचलताना दिसत नाही, अशी नाराजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.