बारामती (प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण लागू करा नाहीतर खुर्च्या खाली करा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भिगवण रोडवरील सहयोग निवासस्थानाबाहेर मराठा समाजाने ढोल बजावआंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मोठा फौंजफाटा तैनात केला होता. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात आंदोलनाची धग वाढत आहे. बारामती येथेमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर ‘ढोल वाजवून आरक्षणाची मागणी करण्यात आली. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
राज्य सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे मराठा आरक्षणस अडथळा निर्माण झाला आहे. सरकारने न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. महाधिवक्ता यांनी वकिलांमार्फत कागदपत्रांची पूर्तता केली नाही. तसेच त्यांनी स्वतःही बचावात्मक धोरण अवलंबले त्यामुळे मराठा समाज आरक्षणा लासर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. मागणी मान्य झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.