पुणे – पश्चिम महाराष्ट्राचा जैवविविधतेत मोलाची भर घालणारे संशोधन नुकतेच वन्यजीव अभ्यासकांनी केले आहे. पुण्यातील वन्यजीव संशोधकांनी सांगली जिल्ह्यातील आंबा घाट आणि पुणे जिल्ह्यातील वरंधा घाट या ठिकाणांहून विंचवाच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधता संशोधनाची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्टरी एज्युकेशन अँड रिसर्च (इनहर) या वन्यजीव संशोधन व संवर्धन क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. या संस्थेतील वन्यजीव संशोधक शौरी सुलाखे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. आनंद पाध्ये, गौरांग गोवंडे, शुभंकर देशपांडे, मकरंद केतकर, सृष्टी भावे, चैतन्य रिसबुड व अक्षय मराठे यांनी या संशोधनासाठी काम केले आहे. वन्यजीव संशोधक डॉ. देशभूषण बस्तावडे यांनी या मोहिमेसाठी मार्गदर्शन केले.
या संशोधनाबद्दल सुलाखे म्हणाले, “सांगली जिल्ह्यातील आंबा घाट आणि पुणे जिल्ह्यातील वरंधा घाट या ठिकाणी केलेल्या संशोधनामधून आम्ही “कायरोमॅचिटस’ या कुळातील विंचूच्या दोन नव्या प्रजाती उजेडात आणल्या आहेत. त्यांना अनुक्रमे “कायरोमॅचीटस पराक्रमी’ आणि “कायरोमॅचीटस रामदासस्वामी’ अशी नावे देण्यात आली आहेत. खडकात राहणारे विंचू हे वृक्ष अथवा जमिनीवर राहणाऱ्या विंचवांपेक्षा कमी प्रमाणात स्थानबदल करीत असल्याने त्यांच्यात प्रदेशनिष्ठता आढळते.
याला “पॉईंट एंडेमिझम’ असे म्हणतात. एकाच स्थानाजवळील अधिवासाशी फार मोठा काळ संलग्न राहिल्यामुळे त्यांच्यात जनुकीय व शारीरिक बदलही झालेले आढळून येतात. त्यामुळेच प्रदेशनिष्ठ प्रकारातील हे संशोधन महत्त्वाचे ठरते. या दोन्ही प्रजातींवर आधारीत संशोधन निबंध “युस्कॉर्पियस’ या अमेरिकन वैज्ञानिक नियतकालिकाच्या ऑक्टोबर महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.’
अशा संशोधन मोहिमांमधून नवनवीन प्रजाती उजेडात आल्याने पश्चिम घाटाचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखीत होऊन त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी हातभार लागणार आहे. त्याचबरोबर पक्षी, सस्तन प्राणी, सरीसृप या जीवांच्या तुलनेत संधीपाद जीवांची विविधता अजून दुर्लक्षित असून त्यावर मोठे संशोधन होणे आवश्यक असल्याचे डॉ. बस्तावडे यांनी नमूद केले.
विंचवाच्या नावांमुळे आपल्या इतिहासाची ओळख
आंबा घाटातून संशोधित केलेल्या “पराक्रमी’ या प्रजाती आम्ही सर्वप्रथम जिथे पाहिली ती जागा पावन खिंडीपासून अगदी जवळ आहे. पावन खिंडीचा गौरवशाली इतिहास मराठी माणसासाठी सदैव वंदनीय आहे. म्हणून तिथल्या पराक्रमाच्या आदराप्रित्यर्थ आम्ही या विंचवाचे नाव “पराक्रमी’ असे ठेवले. तर वरंधा घाटाच्या पायथ्याला शिवथरघळ ही रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेले ठिकाण आहे. या स्थानावरून प्रेरित होऊन आम्ही या प्रजातीला “रामदास स्वामी’ असे नाव दिले आहे.
या प्रजातीची नामनिश्चितीबाबत दिलेले वर्णन वाचून सदर नियतकालीकाच्या संपादकांचे कुतूहल जागे झाले आणि त्यांनी पावनखिंडीचा पराक्रम इंटरनेटवर शोधून पूर्ण वाचून काढला. हा इतिहास वाचून ते फारच अचंबित झाले आणि त्यांनी आम्हाला या वर्णनात या इतिहासाची माहिती वाढवायला सांगितली. एका अमेरिकन माणसाला या जागेबद्दल कुतूहल आणि आदर वाटला ही आमच्यासाठी फारच अप्रुपाची गोष्ट होती. अशी भावना सहसंशोधक शुभंकर देशपांडे यांनी व्यक्त केली.