हर्षवर्धन पाटील यांची “व्हीएसआय’च्या ऊस संशोधन प्रकल्पांना भेट
रेडा (प्रतिनिधी) – व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संशोधनाचे काम विविध पातळ्यांवरती चालू आहे, असे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील यांनी मांजरी बु. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस संशोधन प्रकल्पांना शनिवारी (दि.25) भेट दिली व नवीन संशोधनांची माहिती घेतली. यावेळी पाटील यांना ऊस पिकासंदर्भात चालू असलेल्या संशोधनांची माहिती व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख व प्रमुख शास्त्रज्ञांनी दिली.
व्हीएसआयमधील संशोधित उस वाणांचा व पिकातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रभावीपणे वापर केल्यास अधिक उस उत्पादन व साखर उतारा वाढीबरोबर एकूण उत्पादन खर्चही कमी होण्यास मदत होत आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच ऊसाचे एम.एस.10001, व्ही.एस.आय.8005 हे वाण महाराष्ट्रातील सर्व भागातील शेतीसाठी चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ऊस पिकांची विविध वाणांची प्रात्यक्षिके, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प, ठिबक सिंचन, आंतरपिके, हंगामी पिके आदीच्या चाचणी प्रकल्पांना भेटी देऊन त्याद्वारे चालू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची माहिती घेतली.