नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत नवनवीन आजार समोर येत आहेत. आधी काळी बुरशी आणि आता पांढरी बुरशी यामुळं अनेकांना प्राण गमवावा लागत आहे. म्युकरमायकोसीस अर्थात ब्लॅक फंगसमुळं अनेकांना आपले डोळे गमवावे लागले. अनेक राज्यात या आजाराला महामारी घोषित करण्यात आलं. त्यात आता सुमार दर्जाचं सॅनिटायझर देखील ब्लॅक फंगस आजारासाठी कारणीभूत ठरू शकतं, असा दावा करण्यात आला आहे.
करोनापासून बचाव करण्यासाठी तुम्ही हलक्या दर्जाच्या हँड सॅनिटायझरचा वापर करत असाल तर आताच सावध व्हा. निकृष्ठ दर्जाचं स्प्रे सॅनिटायझर तुम्हाला नुकसान पोहचवू शकतं. ब्लॅक फंगसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये सॅनिटायझर देखील कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे.
आयआय़टी-बीएचयूमध्ये सिरॅमीक इंजिनियर विभागातील वैज्ञानिक डॉ. प्रितम सिंह यांनी म्हटलं की, सॅनिटायझर आपण चेहऱ्याच्या जवळ फवारल्याने काही प्रमाणात सॅनिटायझर आपल्या डोळ्यात आणि नाकांत जातं. त्यामुळे डोळ्यांच्या रॅटीनासहित नाकातील कोशिका मृत होतात. सॅनिटायझरमध्ये ५ टक्क्यापर्यंत मिथेनॉल असतं. मिथेनॉल हे फंगस तयार करण्यासाठी पोषक ठरतं. यामुळे डोळ्यांच्या रॅटीना खराब होऊ शकतात. तसेच दृष्टीही कमी होण्याची शक्यता अधिक आहे.
सध्या चौकात कुठेही सॅनिटायझर विकत मिळतात. निकृष्ठ दर्जाच्या सॅनिटायझरमध्ये पाच टक्के मिथेनॉलचे प्रमाण असतं. त्यातच अनेक सॅनिटायझर मानकानुसार विकण्यात येत नाहीत. हे सॅनिटायझर अधिक घातक ठरू शकतात. सॅनिटायझरचा वापर करायचा असेल तर द्रव स्वरुपात करावा. जो की थेंबाने हातावर घेता येईल. शक्यतो स्प्रे सॅनिटायझर टाळावे. तसेच चांगल्या ब्रँडचे सॅनिटायझर वापरावे.