‘भीती पसरू न देता करोनावर संशोधन हे आव्हान’

डॉ. रमण गंगाखेडकर : एआयटीतर्फे “जीवनगौरव’ प्रदान

पुणे – साथरोग तज्ज्ञ म्हणून कोविड व्यवस्थापन करताना नवीन गोष्टी शिकत संशोधन करत होतो. जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरू न देता, यावर काम करणे गरजेचे असल्याने हे आव्हान सोपे नव्हते. काही अंशी ही जबाबदारी पार पाडण्यात यश आले असावे,’ अशा शब्दांत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-आयसीएमआर) साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी विनम्र कृतज्ञता व्यक्‍त केली.

दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (एआयटी) 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. गंगाखेडकर ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी त्यांना जीवनगौरव पुरस्कार, तर “एम तत्व’ आणि सिम्बो.एआय’ कंपनीचे सहसंस्थापक बलजीत सिंग व प्रवीण प्रकाश यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. अहुजा (एव्हीएसएम) ऑनलाइन सहभागी झाले होते. तर “एआयटी’ कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमाला संचालक ब्रिगेडियर अभय भट, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील आदी उपस्थित होते. डॉ. गंगाखेडकर यांच्या वतीने डॉ. बी. पी. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.

“लष्कराची शिस्त इथल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्येही दिसत आहे. माझीही लष्करी सेवेत जाण्याची इच्छा होती. मात्र, शक्‍य झाले नाही. नागरी सेवेत आलो,’ असेही डॉ. गंगाखेडकर यावेळी म्हणाले.

“एआयटी’त उभारणार पुणे विद्यापीठाचे संशोधन केंद्र : कुलगुरू
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नेहमीच संशोधनाला प्राधान्य देत आहे. त्याचाच भाग म्हणून विद्यापीठात “एसपीपीयू रिसर्च पार्क’ उभारले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषिक्षेत्र, इलक्‍ट्रिकल मोबेलिटी, आरोग्यसेवा, पाणी आदी क्षेत्रांत संशोधनाचे काम सुरू आहे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे असलेला कल पाहता लवकरच येथे विद्यापीठाच्या सहयोगाने संशोधन केंद्र उभारण्याचा मानस आहे,’ अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.