पुणे : कल्याणीनगर येथील सुग्रा टेरेस येथे इमारत नूतनीकरणाचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने एक मजूर अडकला होता. इतर मजूरांनी दोन तास प्रयत्न करुन ही मजूराची सुटका झाली नाही.
त्यामुळे अखेर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यानंतर येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहनचालक गणेश पराते, जवान वसंत कड, सुनिल खराबी, रतन राऊत यांनी घटनास्थळी येत तातडीने मातीत अडकलेल्या मजूराची सुटका केली. सुटका करताच जखमी मजूराला उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून रूग्णालयात रवाना केले.