नवी मुंबई – एकीकडे सरकार करोनाबाबत काळजी घेण्याचे सातत्याने आवाहन करत असतानाच वैद्यकीय तज्ञ, डॉक्टर तसेच अन्य कर्माचारी वर्गाने वापरलेल्या हातमोज्यांसह अन्य वैद्यकीय कचरा विकणारी टोळी सक्रीय असल्याचे पोलीसांकडून सांगितले जात आहे. अशाच एका प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
करोनाबाधितांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी वापरलेले हातमोजे पुन्हा धुवून विकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा करण्यात आला होता. मात्र, तरीही त्याबाबतची उदासिनता कायम असल्याचेच या घटनेतून स्पष्ट होत आहे.
वापरुन झालेल्या वस्तू विकताना अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव प्रशांत सुर्वे असे आहे. डॉक्टर वापरत असलेले निळे रबरी हातमोजे धुवून पुन्हा पॅक करुन विकले जात होते. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी या वस्तू पॅक करण्यासाठी घेतलेल्या दुकानावर छापा टाकल्यावर वापरुन झालेल्या हातमोज्यांची जवळपास अडीचशे पोती जप्त करण्यात आली आहेत. या छाप्यात पोलीसांनी 17 यंत्रे व पुन्हा धुतलेले हातमोजे तसेच अन्य काही साहित्य असा माल जप्त केला आहे.
हे उद्योग करणारी एखादी टोळी सक्रीय झाली असावी असा संशयही पोलीसांनी व्यक्त केला आहे.
करोनाचा धोका वाढल्यानंतर विविध रुग्णालयांमध्ये साठत असलेल्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक शहरात एका एजन्सीला काम दिले गेले आहे.
मात्र, त्यांच्याकडूनच हा कचरा पूर्ण गोळा केला जात नाही व त्यामुळेच अशा घटना घडत आहेत, असेही पोलीसांनी सांगितले आहे. याबाबत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची सध्या कसून चौकशी केली जात असून या एजन्सीतील एखाद्या व्यक्तीचाही यात हात असून शकतो अशी शंकाही पोलीसांनी व्यक्त केली.