पुणे – अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकांच्या विक्रीचा अहवाल झोनप्रमुखांकडून प्रवेश नियंत्रण समितीने मागविला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर माहिती उपलब्ध व्हावी यासाठी बालभारतीकडून 1 लाख 10 हजार माहिती पुस्तिका छापून घेण्यात आल्या होत्या. या पुस्तिकांचे झोननिहाय वाटप करण्यात आले आहे. Requested sales report for information books
या झोनमधील पुढे शाळांना त्याचे वाटप झाले होते. 25 मे पासून या पुस्तिकांचे वाटपाचे कामकाज सुरू झाले आहे. हडपसर येथील साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील जी.व्ही.टकले यांच्याकडे पुस्तिक विक्रीची माहिती झोनप्रमुखांनी चलनासह सादर करणे बंधनकारक आहे. टकले यांनी हा एकत्रित अहवाल पुणे विभागीय कार्यालयातील पर्यवेक्षीय अधिकारी आर.जी.जाधव यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे.
पुस्तिकेची किंमत 150 रुपये ठेवण्यात आली होती. शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रत्येकी 120 रुपये प्रमाणे विक्रीची रक्कम अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या नावे कर्वे रोड येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यावर जमा करणे गरजेचे आहे, अशा सूचना अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी शाळांचे मुख्याध्यापक, झोनप्रमुख, पर्यवेक्षीय अधिकारी, झोनचे संपर्कप्रमुख यांना दिल्या आहेत. पुस्तिका विक्रीतून शाळांना प्रत्येक पुस्तिकेसाठी 30 रुपये मिळणार आहेत. शाळांनी संबंधित पुस्तिका वाटप केंद्रीतील कर्मचारी, संगणक ऑपरेटर, शिपाई यांना ही रक्कम वाटप करणे आवश्यक आहे. मात्र, याची अंमलबजावणी शाळांकडून होणार का याबाबत साशंकता आहे. काही मार्गदर्शन केंद्रांना, शाळांना पुरेशा पुस्तिकाही मिळाल्या नाहीत.