उत्तरप्रदेशातील निवडणूक रणांगणात यावेळी बहुजन समाज पक्षाची (बसप) फारशी चर्चा होताना दिसली नाही. त्यासाठी दोन प्रमुख कारणे मानता येतील. पहिले म्हणजे सत्तास्पर्धेत बसप कुठेच नसल्याचा जनमत चाचण्यांनी काढलेला निष्कर्ष. तर, प्रचारासाठी बसपने फारसा न लावलेला जोर हे दुसरे कारण.
स्वत: बसप प्रमुख मायावती यांचा झंझावात प्रचारावेळी फारसा आढळून आला नाही. त्यामुळे प्रचारधुमाळीत हत्तीची (बसपचे चिन्ह) चाल मंदावल्याचेच दिसले. बसपने भाजपशी गुप्ता समझोता केला आहे. निवडणुकीनंतर ते पक्ष एकत्र येऊ शकतात, अशा राजकीय कंड्याही पिकताना दिसल्या. मात्र, मायावती यांनी ती शक्यता साफ फेटाळून लावली.
जनमत चाचण्यांचा निष्कर्ष चुकीचा ठरेल. बसपने जोरदार मुसंडी मारलेली दिसेल, असा दावाही त्यांनी केला. नेमके घडणार काय ते निकालानंतरच समोर येईल. मात्र, बसपचा लो-प्रोफाईल प्रचार सर्वांसाठीच एक कोडे ठरला आहे. बसपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. त्या पक्षाने पंजाब निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दलाशी युती केली. त्या राज्यात बसप कशी कामगिरी करणार याविषयीही उत्सुकता असेल.