वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या सरकारच्या व्यवस्थापन व अर्थसंकल्पीय समितीच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या नीरा टंडेन यांची निवड घोषित केली आहे. त्यांच्या निवडीला रिपब्लिकन पक्षाच्या अनेक खासदारांनी जोरदार विरोध दर्शवल्याने त्यांची निवड वादात सापडली आहे.
बायडेन यांनी केलेली ही सर्वात वाईट निवड आहे, असा आक्षेप रिपब्लिकन पक्षाच्या काही खासदारांनी घेतला आहे. ही समिती प्रशासकीय कारभाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अध्यक्षांच्या विचारानुसार प्रशासनाचा कारभार चालवण्याची प्रमुख जबाबदारी या समितीवर असते.
तसेच अमेरिकेच्या अर्थसंकल्पावरही याच समितीचे वर्चस्व असते. त्या समितीचे अध्यक्षपद अमेरिकन संसद सदस्यांवर जाहीरपणे टीका करणाऱ्या नीरा टंडेन यांच्याकडे देणे अयोग्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. रिपब्लिकन सिनेटर जॉन क्रोनिन यांनी म्हटले आहे की, नीरा टंडेन यांनी अनेक सिनेट सदस्यांची जाहीरपणे खिल्ली उडवली आहे.
त्यांनी केलेली विधाने आक्षेपार्ह आहेत. त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करणे धक्कादायक आहे. नीरा टंडेन यांनी आपली अनेक ट्विटर विधाने गेल्या दोन आठवड्यांमध्ये डिलिट केली असली तरी ती परत मिळवणे आम्हाला अशक्य नाही. त्यांची ही कृतीही बालीश स्वरूपाची आहे अशी टीकाही त्यांनी केली.