वॉशिंग्टन : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे रविवारी अमेरिकेतील अनेक शहरात अमेरिकन भारतीयांनी नव्या सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने केली. काही ठिकाणी मोर्चे काढून आपला निषेध व्यक्त केला.
दरम्यान, या कायद्याच्या काही समर्थकांनी भारताने केवळ शेजारील देशांतील अल्पसंख्यांकांची काळजी घेतली. कामुळे कोणत्याही भारतीयाच्या नागरीकत्वाला धक्का लागलेला नाही, असे प्रतिपादन केले. मात्र या समर्थकांची संख्या निदर्शकांच्या तुलनेत अगदी नगण्य होती. निदर्शकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. “का’चा फेरविचार करा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिकत्व सुची (एनआरसी) मागे घेण्याची मागणी केली.
न्यूयॉर्क, शिकागो, ह्यूस्टन, ऍटलांटा आणि सॅनफ्रान्सिस्को येथे भारतीय दुतावासाची कार्यालये आहेत. तेथे निदर्शकांनी भारत माता की जय आणि हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई – आपसमें है भई भाई अशा घोषणा दिल्या. काही का कायद्याच्या समर्थकांनी निदर्शकांसमोर सरकारच्या समर्थनार्थ आणि हे धाडसी पाऊल उचलल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या घोषणा दिल्या.
सर्वात मोठी का विरोधी निदर्शने सर्वात शिकागो येथे झाली. काही मैल लांब मानवी साखळी उभारण्यात आली होती. निदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजधानी वॉशिंग्टनमध्ये सुमारे 500 भारतीयांनी निदर्शने केली. त्यांनी भारतीय दुतावासापासून व्हाईट हाऊउसजवळील गांधी पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला.
का कायद्या विरोधात अमेरिकेत वंश हत्या रोखण्यासाठी नव्यानेच उभारलेल्या आघाडीने आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे 30 शहरात निदर्शने करण्यात आली. या आघाडीत, अमेरिकन मुस्लीम कौन्सिल, इक्वॅलिटी लॅब्स, ब्लॅक लिव्हर मॅटर, ज्युइश व्हॉईस फॉर पिस, आणि हिंदु फॉर ह्युमन राईटस या संस्था सहभागी आहेत.