Republic Day 2026 – ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, दि. 26 रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या प्रजासत्ताक सोहळ्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवारी सकाळी 9.15 वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी सातारा जिल्हा पोलीस दलाची परेड होणार आहे. उत्कृष्ट कामगिरीनिमित्त पोलिसांना मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने छत्रपती शाहू स्टेडियम येथे मैदानावर टॅंकरने पाणी मारून मैदान टवटवीत केले आहे. ठिकठिकाणी मैदानाची आखणी करण्यात आली असून संचलन, व्यासपीठ आणि परेडसाठी करावयाचा प्रोटोकॉल याची सुद्धा रंगीत तालीम घेण्यात आली. जिल्ह्यातील हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांना नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांना काही काळासाठी साताऱ्यातून प्रतिबंधित करण्यात आले आहे. सातारा पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांची माहिती मागवली असून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस कवायत मैदान तसेच शहरातील एन्ट्री पॉईंट्स येथे पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या सर्व तयारीचा आढावा स्वतः पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी घेतला आहे. सातारा शहर प्रजासत्ताकमय शहरात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारे शुभेच्छा फलक झळकू लागले आहेत. शहरामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त केशर जिलेबी खरेदी करून त्याच्या सेवनाची मोठी परंपरा आहे. त्यामुळे शहरातील मिठाई विक्रेत्यांनी याची तयारी केली असून जिलेबीचे मोठे घाणे हॉटेलच्या बाहेर सजू लागले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी साताऱ्यातील सेल्फी पॉईंटवर स्वतःचे फोटो काढण्याचे आता नवीन सत्र सुरू झाले आहे. हे लक्षात घेऊन सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने येथील सेल्फी पॉईंटची स्वच्छता केली.