नवी दिल्ली – देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला आता अवघे चार दिवस राहिले असून राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनाची सध्या जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या देशात आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. यंदा भारत देश 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या दिवशी राजधानी दिल्लीत परेडचे आयोजन करण्यात येते. ही परेड पाहण्यासाठी जगभरातून हजारो लोक येतात.
अशात इथे जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर तुम्हाला आताच याचे तिकीट काढावे लागते. यासाठी तुम्हाला कुठं बाहेर जाण्याची गरज नसून, तुम्ही हे तिकीट घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने काढू शकता. ऑनलाईन पोर्टलद्वारे तिकिटांची विक्री केली जात असून एका दिवसात किती तिकिटे उपलब्ध होतील हे सकाळी 9 वाजता वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाते. त्यांची किंमत 20 ते 500 रुपयांपर्यंत आहे.
जर तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ही भव्य परेड बघायची असेल तर, सर्वप्रथम तुम्हाला www.aaamantran.mod.gov.in वर जावे लागेल. मग तुम्हाला लॉगिन करावे लागेल. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि नंतर कॅप्चा करावा लागेल. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. OTP टाकल्यानंतर तुम्ही लॉगिन करू शकता. जर तुम्ही आधी नोंदणी केली नसेल. तर, तुम्हाला साइन अप करावे लागेल.
येथे तुम्हाला तुमचे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करावे लागतील. यानंतर तुमच्या नंबरवर OTP येईल, तो टाका. आता येथून तुम्हाला तिकीट बुक करता येईल. सर्व तिकिटांवर एक युनिक QR कोड दिला जाईल, जो परेडच्या ठिकाणी स्कॅन करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जाण्याची परवानगी मिळेल. अन्यथा तुम्हाला याठिकाणी सोडणार नाही.