नाशिक : मालेगामध्ये आज आणखी ८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात चार वर्षाच्या मुलिचादेखील समावेश आहे. आज आलेल्या अहवालानंतर मालेगावात एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १२६ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर नाशिक जिल्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४२ वर पोहचली आहे.
कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १३ कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. तर चार संशयितांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. आज मालेगावात सापडलेल्या रुग्णांमध्ये तिघे जण नया इस्लामपूर भागातील आहे. तर उस्मानाबाद परिसरातील दोघांचा समावेश आहे. तसेच जाफरानगर परिसरातील एका वृद्धेचा अहवाल आज बाधित आढळून आला आहे.
तर चार वर्षाची मुलगी आणि एक २५ वर्षाची महिला या दोघीही इस्लामपुरा परिसरातील रहिवाशी आहेत. या रुग्णावर मालेगावातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व रुग्ण कोरोना बाधित त्यांच्या निकटवर्तीयांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळते आहे. मालेगावात लॉकडाऊनचे नियम अत्यंत कठोर करण्यात आले असुन, अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.