सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील १३ जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती गुरुवारी रात्री उशिरा प्रशासनाने दिली. त्यापूर्वी संध्याकाळी उरुल (ता. पाटण येथील युवक पाँझिटिव्ह आला होता. त्यामुळे दिवसभरात १४ पाँझिटिव्ह झाले. जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७०३ झाली आहे.
महाबळेवर तालुक्यातील कुरोशी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यूपश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच खटाव तालुक्यातील निढळ येथील २० वर्षीय गरोदर स्त्रीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
गुरुवारी रात्री निष्पन्न झालेल्या बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील वडले येथील ४० वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, १ वर्षीय बालक, ८९ व ३० वर्षीय पुरुष, बरड येथील २३ व २६ वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील निढळ येथील २० वर्षीय महिला.
महाबळेश्वर तालुक्यातील कुरोशी येथील ५५ वर्षीय पुरुष (मृत) या व्यक्तिने गळफास घेऊन काल आत्महत्या केलेली होती. मृत्यूपश्चात त्याच्या स्त्रावाचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
वाई तालुक्यातील आसरे येथील ५५ वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील ओझरे येथील ५ वर्षाची मुलगी, ३४ वर्षीय पुरुष व २५ वर्षाची महिला यांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ७०३ रुग्ण आढळले आहेत. ४४८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये 223 जणांवर उपचार सुरु असून 30 जणांचा मृत्यू झालेला आहे.