नवी दिल्ली- अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या 19 वर्षीय मुलाने अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या निवासस्थानी म्हणजेच व्हाईट हाऊस मध्ये ट्रक घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाला व्हाईट हाऊस सुरक्षा रक्षकांकडून अटक करण्यात आली आहे. साई वर्षित कंदुला असे या भारतीय वंशाच्या तरुणाचे नाव आहे. कंदुला हा अमेरिकेतील मिसुरी येथील सेंट लुईसच्या बाहेरील चेस्टरफिल्डची रहिवासी असून तो स्वतःला हिटलर समर्थक असल्याचे सांगत आहे.”आपल्याला सत्तेवर नियंत्रण ठेवायचे आहे म्हणून अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना ठार मारायचे आहे”. असे साई वर्षित कंदुला व्हाईट हाऊस सुरक्षा रक्षकांना ओरडून सांगत होता. तसेच या घटनेवेळी जो बायडन व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते.
अपघातात कोणीही जखमी झाले नाही –
सदर घटना सोमवारी रात्री 10 वाजता भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी 7 वाजता घडली. ‘मुलगा बॉक्स ट्रक चालवत होता, जो त्याने थेट व्हाईट हाऊसच्या उत्तरेकडील लाफायट स्क्वेअरजवळील सुरक्षा अडथळ्यावर धडकला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या मुलाला घटनास्थळी अटक करण्यात आली असून आता त्याची चौकशी करण्यात येत आहे’. अशी माहिती अमेरिका सिक्रेट सर्व्हिस एजन्सी ने दिली आहे.
कंदुला सहा महिन्यांपासून हल्ल्याची करत होता तयारी –
”साई वर्षित कंदुला हा या हल्ल्याची 6 महिन्यांपासून योजना आखत होता. रात्री आठ वाजता त्याने सेंट लुईस ते डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण घेतले. यानंतर त्यांनी विमानतळाजवळून एक ट्रक भाड्याने घेतला आणि थेट व्हाईट हाऊसमध्ये आला. त्याच्याजवळ किंवा ट्रकमध्ये शस्त्रे आणि स्फोटके सापडली नाहीत. स्वत:ला नाझी समर्थक असल्याचे सांगताना कंदुला म्हणाला की, ”हिटलरच्या विचारांनी मी खूप प्रभावित आहे”. कंदुलाला भेटलेल्या लोकांची ओळख पटवली जात असून तो कुठल्यातरी जिहादी गटाच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे”.असे अमेरिका सिक्रेट सर्व्हिस एजन्सीने म्हटले आहे.
पोलिसांनी केले गुन्हे दाखल-
अमिरेकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला जीवे मारण्याची धमकी देणे, अपहरण करणे, हानी पोहोचवणे अशा विविध आरोपांखाली पोलिसांनी कंदुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर त्याच्यावर धोकादायक शस्त्राने प्राणघातक हल्ला आणि मोटार वाहनाचा निष्काळजीपणे वापर केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, कंदुलाने 2022 मध्ये मार्चुट सीनियर हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, त्याला डेटा अॅनालिटिक्स आणि कोडिंग भाषांमध्ये रस आहे म्हणजेच त्याला आयटीची आवड आहे. तसेच कंदुला बाबतची अधिक ची माहिती पोलिसांनी अद्यापही सार्वजनिक रित्या उघड केलेली नाही.