आजारी परदेशी नागरिकाची माहिती कळवा

हॉटेल मालक किंवा चालकांना विभागीय आयुक्‍तांचे आवाहन

पुणे – शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल, लॉजमध्ये थांबलेल्या परदेशी व्यक्‍तींची नियमित तपासणी करावी. त्यामध्ये कोणी व्यक्‍ती आजारी असल्यास हॉटेल मालक किंवा चालक यांनी तत्काळ विभागीय आयुक्‍त कार्यालय किंवा आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी (दि. 6) झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

पर्यटन, शैक्षणिक किंवा व्यावसायिक कामानिमित्त विविध देशांतील नागरिक भारतात येत असतात. प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरे असून, परदेशातून शहरात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हे परदेशी नागरिक अलिशान हॉटेल्स, लॉजमध्ये मुक्‍कामी राहतात. सध्या करोना बाधित देशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. मात्र, त्यावेळी नागरिकांना लक्षणे आढळून येत नाही. तर काही परदेशी नागरिक अनेक दिवस शहरातच वास्तव्य करतात. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व छोटे-मोठे हॉटेल आणि लॉज चालक किंवा मालक यांनी खबरदारी बाळगावी.

प्रशासनाला प्रत्येक हॉटेलमध्ये जावून परदेशी नागरिक आहेत की नाही, असतील तर ते आजारी आहेत का? याची खात्री करणे शक्‍य नाही. त्यामुळे हॉटेल मालक किंवा चालक यांनी त्यांच्या हॉटेल किंवा लॉजमध्ये परदेशातून येणारा नागरिक कोणत्या देशातून आला, त्या देशात करोनाचा प्रादुर्भाव आहे की नाही याची माहिती घेऊन तो आजारी आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. त्या परदेशी नागरिकाला सर्दी, ताप, खोकला, घसा किंवा आशक्‍तपणा यापैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ जिल्हा प्रशासन किंवा आरोग्य विभागाला कळवावे. त्या परदेशी नागरिकाला तत्काळ नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येईल.

दरम्यान, परदेशी नागरिकाची माहिती देणे हॉटेल व्यवस्थापकांना बंधनकारक आहे, त्यामध्ये हलगर्जीपणा करू नये, असेही विभागीय आयुक्‍तांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.