नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अलॉन मस्क प्रचलित आहेत. त्यांची स्टार लिंक कंपनी उपग्रहाच्या आधारावर भारतात ब्रॉडबँड इंटरनेट सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कूटनीती फाउंडेशन अभ्यास करणार्या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, स्टार लिंकला भारतात काम करण्यास परवानगी दिली तर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
मस्क यांची स्टारलिंक शेळीच्या कातडीतील लांडगा आहे. त्याला वेळीच ओळखून टाळण्याची गरज व्यक्त करण्यात आली. स्टारलिंक कंपनीचा संबंध अमेरिकेतील गुप्तचर संस्था आणि लष्कराशी आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्था आणि लष्कराला सहज उपलब्ध होईल असे या संस्थेचे म्हणणे आहे. स्टारलिंक कंपनी सर्वसामान्य ग्राहकाबरोबरच अमेरिकन लष्कर आणि गुप्तचर संस्थांना आपल्या सेवा पुरविते.
त्यामुळे या कंपनीकडून ग्राहकांच्या माहितीचा सहज दुरुपयोग होऊ शकतो. तसेच भारतावर हेरगिरी केली जाऊ शकते. सध्याच्या परंपरागत मोबाईल सेवा टॉवरचा वापर करून पुरविल्या जातात. तर उपग्रह आधारित सेवा या टॉवरऐवजी उपग्रहाचा वापर करून दिल्या जातात.
या उपग्रहाचे नियंत्रण भारताकडे नाही किंवा भारतातून होत नाही. त्यामुळे यावर सरकारचे कसलेही नियंत्रण न राहता ते अमेरिकेकडे राहणार आहे. स्टारलिंकच्या सेवा भारताबरोबरच इतर अनेक देशांना दिल्या जातात. त्यावर कोणत्याही भौगोलिक मर्यादा नाहीत. फक्त अमेरिकेतच या सेवांचे विश्लेषण केले जाऊ शकते. त्यामुळे जगातील देशांची सर्व माहिती स्टारलिंकला उपलब्ध होणार आहे. त्यावर सरकार कसे काय नियंत्रण ठेवेल असा सवाल या अहवालात करण्यात आला आहे.
स्टारलिंकचा अजून अर्ज नाही
दरम्यान दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवे तंत्रज्ञान भारत स्वीकारेल मात्र संबंधित कंपन्यांना भारताच्या सुरक्षा विषयक नियमांची अंमलबजावणी करणे अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. अजूनही स्टारलिंकचा औपचारिक अर्ज भारतात आलेला नाही. मात्र ही कंपनी या सेवा भारतात देण्यासाठी अनौपचारिक पातळीवर प्रयत्न करत आहे. भारतातील मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांनी यासाठीचे स्पेक्ट्रम जुन्या पद्धतीने म्हणजे बोली पद्धतीने देण्याची मागणी केली आहे. मात्र भारत सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.