‘इंद्रायणी थडी’त साकारणार ‘राम मंदिरा’ची प्रतिकृती

पिंपरी – शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत असलेल्या इंद्रायणी थडी जत्रेमध्ये आमदार आणि भाजप शहाध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडून अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तमाम रामभक्तांसाठी ही यात्रा पर्वणी ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांनी या जत्रेच्या माध्यमातून “जय श्री राम’ चा नारा दिला आहे.

आमदार लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीत “इंद्रायणी थडी’ जत्रा आयोजित केली जाते. येत्या 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असे चार दिवस सकाळी 10 ते सायं. 10 या वेळेत ही जत्रा भोसरीतील गावजत्रा मैदानावर होणार आहे.

विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसारच आमदार लांडगे यांना शहराध्यपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी आमदार लांडगे यांनी “प्लॅनिंग’ केले आहे. कोणताही कार्यक्रम अत्यंत भव्य-दिव्य पद्धतीने साजरा करुन नागरिकांमध्ये सतत चर्चेत राहण्याची आमदार लांडगे यांची जुनी पद्धत आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत राम मंदिराची प्रतिकृती उभारत हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांकडून उपक्रमाचे स्वागत…
महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या हेतूने सुरू केलेल्या इंद्रायणी थडी जत्रेत यावर्षी जाज्वल्य हिंदुत्वाची साक्ष देणाऱ्या “राम मंदिर’ची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. सामाजिक उपक्रम म्हणून इंद्रायणी थडी महाराष्ट्रात लक्षवेधी होईल. पण, त्याहून “राम मंदिर’च्या प्रतिकृतीमुळे देशभरातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांच्या स्मरणात राहिल, अशा भावना शहरातील हिंदुत्त्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींकडून व्यक्त केल्या जात आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल आदी विविध संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.