पुणे – महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या वारीची प्रतिकृती पुणे स्थानक परिसरातील ताडीवाला रोडच्या गेटजवळ बसविण्यात आली आहे. वारीचे हे शिल्प नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंडल रेल्वे प्रबंधक मिलिंद देऊस्कर आणि वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
गेल्या अनेक वर्षांपासून वारी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. पुणे हे वारीचे प्रमुख केंद्र आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांबरोबर लाखो वारकरी पुण्यामार्गे पंढरपूरला जातात. शहराचा संपूर्ण परिसर या दरम्यान भक्तीमय होतो.
या परंपरेचे महत्त्व लक्षात घेता पुणे स्थानकावर या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत, असे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले.