माढा पॅटर्नची पुनरावृत्ती?

सम्राट गायकवाड
महादेव जानकर रणांगणात उतरण्याची शक्‍यता

सदाभाऊंच्या घोषणेमुळे वाढली उत्सुकता
सातारा – जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी माढा लोकसभेच्या पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता आहे. माण तालुक्‍याचे सुपुत्र व कॅबिनेट मंत्री महादेव जानकरांची ऐनवेळी उमेदवारीची घोषणा होऊ शकते. महायुतीतील घटक पक्षांचे नेते सदाभाऊ खोत यांनी वाळवा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यामुळे साहजिकच माण-खटावमधून महादेव जानकर यांना रणांगणात उतरवून उमेदवारीचा तिढा सोडविण्यात येऊ शकतो.

सद्यःस्थितीत माण-खटाव मतदारसंघात राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून निघाले आहे. विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचा पराभव करण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. मात्र, उमेदवारी नेमकी कोणी करायची, याबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. नेमक्‍या उमेदवारीच्या मुद्द्यावरच एकत्रित आलेल्या नेत्यांमध्ये मतभेद होण्याची शक्‍यता ओळखून वेगळाच उमेदवार रणांगणात उतरविण्याची चाल खेळली जाऊ शकते. अशा वेळी साहजिकच माण तालुक्‍याचे सुपुत्र महादेव जानकर यांचे नाव पुढे येणार आहे. जानकर यांनी यापूर्वी 2009 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत जानकरांना माण- खटावमधून निर्णायक मतदान झाले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या यादीत जानकरांचे नाव अग्रस्थानी राहणार आहे.

त्याचबरोबर माण तालुक्‍यात धनगर समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, निवडणुकीत उतरताना जानकरांपुढे धनगर आरक्षणाचा प्रश्‍न साहजिकच असणार आहे. सद्यस्थितीत सरकार धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देवू शकले नसले तरी एसटी प्रवर्गाच्या सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आपसुकच एसटी आरक्षणाची धार कमी करण्यात सरकारला काही प्रमाणात यश मिळाले आहे.

परिणामी जानकरांच्या उमेदवारीमधील महत्वाची अडचण आता काही प्रमाणात का होईना बाजूला राहिली आहे. त्याचबरोबर जानकर यांनी मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील दौरे वाढविले आहेत. विशेषत: माण- खटावमधील राष्ट्रवादीसह महायुतीतील पक्षांच्या नेत्यांशी जानकरांचा संवाद वाढताना दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर जानकर माण- खटावच्या रणांगणात उतरले तर यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे निश्‍चित आहे.

माण-खटावमध्ये होणार…
त्या मतदारसंघामध्ये मिळणार यश महादेव जानकर यांनी माण-खटावमधून लढण्याची तयारी दर्शविली तर त्याचा सकारात्मक परिणाम शेजारील मतदारसंघावर होताना दिसून येणार आहे. विशेषत: धनगर समाजाचे प्राबल्य असलेल्या फलटण, वाई आणि माळशिरस, सांगोला या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला यश मिळू शकते. त्यामुळे जानकर निवडणूक लढणार का, याकडे शेजारील मतदारसंघातील महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या नजरा लागून राहणार आहेत.

उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचाच : मामूशेठ वीरकर
माण-खटावमधून महादेव जानकरांच्या उमेदवारीबाबत रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, “जानकर यांची अद्याप विधान परिषदेची पाच वर्षे बाकी आहेत. अशा स्थितीत विधान परिषदेतील एक जागा कमी करून विधानसभेची एक जागा मिळविणे योग्य ठरणार नाही. मात्र, यंदाच्या निवडणुकीत माण-खटावमध्ये रासपला पोषक वातावरण आहे. त्यामुळे उमेदवारी आम्हालाच मिळणार आणि प्रचंड मतांनी निवडूनही येणार, असा विश्‍वास वीरकर यांनी व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)