हॉटस्पॉट उठवताच बॅंकांमध्ये तोबा गर्दी 

जामखेड  – गेल्या एक महिनापासून लागू असलेले जामखेड शहरातील हॉटस्पॉट उठविण्यात आल्याने शहरातील सर्वच बॅंकांमध्ये तोबा गर्दी झाली.फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. बॅंकेत पैसे काढण्यासाठी नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली होती.

स्टेट बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा सहकारी बॅंक, कॅनरा बॅंक, सेंट्रल बॅंक आदी बॅंकेत अडकून पडलेले पैसे काढण्यासाठी नागरिकांसह वृद्धांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.करोनाला हद्दपार करण्यासाठी सुरक्षितता जपणेच महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेता शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले. मास्क, सामाजिक अंतर राखण्याच्या सक्‍त सूचना तहसीलदार विशाल नाईकवाडे व मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी अलिकडेच दिल्या. मात्र, येथील बॅंकेसमोर त्यांच्या या आदेशाला खो घातल्याचे पाहिला मिळले. दैनंदिन व्यवहारासाठी बॅंकेसमोर नागरिकांची चांगलीच गर्दी केली. यासंदर्भात बॅंकेशी संपर्क केला तेव्हा, गर्दीसाठी आम्ही जबाबदार नसल्याचे अजब उत्तर दिले गेले.

शहरात करोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याने प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून संपूर्ण शहर हॉटस्पॉट करून सर्व अत्यावश्‍यक सेवा बंद होत्या. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. प्रशासनाने बॅंकांच्या ग्राहक सेवा केंद्र चालकांना शहरात सेवा देण्यास सांगितले होते, मात्र अनेक खातेदारांचे आधार नंबर लिंक नसल्याने पैसे काढण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. चौदा दिवसांत नवा रुग्ण न आढळल्याने दि 12 पासून शहरातील हॉटस्पॉट उठवण्यात आल्याने नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले.

नागरिकांनी बॅंकांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. बॅंकेने उपायोजना म्हणून एका खातेदारास बॅंकेत प्रवेश दिला जात असल्याने बॅंकेबाहेर नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली. यावेळी दोन व्यक्तींमध्ये कुठलेही अंतर न ठेवता शेतकरी पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहत आहेत. याबाबत प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकत नसल्याचे बॅंकेचे म्हणणे आहे. बॅंकांपासून सहकारी बॅंकांपर्यंत अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्याने नागरिकांना बॅंके शिवाय पर्याय नसल्याने त्यांनी बॅंकांत गर्दी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.