कास मार्गावर पुन्हा वणव्यांचे सत्र

सातारा   – युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादी असलेल्या कास पठार व डोंगरात वणवे लावण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. कास पुष्प पठाराच्या परिसरातील कुरणे पेटवण्याची स्पर्धा सुरू झाली असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची वन विभागाला कसरत करावी लागत आहे.

वन विभागाच्यावतीने वणवामुक्त सप्ताह राबवला जात असताना कास पठारावरील पर्यावरण कळत नकळत आगीच्या भक्ष्यस्थानी पडू लागले आहे. यवतेश्‍वर ते कासाणी या दरम्यान रस्ता रुंदीकरणामुळे 180 वृक्षांची कत्तल व गौण खनिजाचे उत्खनन यामुळे कासला जाताना अनुभवायला मिळणारी निसर्गरम्यता आता रखरखाटात रूपांतरित झाली आहे.

कासाणी, पेट्री, कास, आंबाणी, जांभळणी, घाटाई आणि बामणोली येथे छोट्या मोठ्या पठारावर धुरांचे लोट दिसू लागले आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे कासच्या पर्यावरणाला आधीच घरघर लागली असताना आता वणव्यांचे सत्र सुरू झाले आहे. मेढा वन परिक्षेत्र अधिकारी एस. आर. परदेशी यांनी सातारा ते कास दरम्यानच्या मार्गावर पर्यावरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाची स्थाने निश्‍चित केली आहेत. जाळरेषा निश्‍चित करणे, वणवे लागणार नाहीत याची जवाबदारी वन व्यवस्थापन समित्यांवर देणे, प्राथमिक शाळांमधून प्रबोधन करणे, अशा उपाययोजना व प्रात्यक्षिक वणवामुक्‍त पर्यावरण सप्ताहात (दि. 1 ते 7 फेब्रुवारी) करण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितले.

वणवा रोखण्यासाठी जाळपट्टे
जंगलांना लावण्यात येणारे वणवे बाब लक्षात घेऊन वाईतील निसर्ग संवर्धक संस्थेच्या प्रशांत डोंगरे, राजेंद्र खरात व सहकाऱ्यांनी वाई-पाचगणी दरम्यानच्या पसरणी घाटात साधारण पाच किमी परिसरात “जाळरेषा’ काढली आहे. त्या धर्तीवर कास-घाटाई आणि कास-बामणोली या दरम्यान जाळरेषा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जाळपट्टे अथवा जाळरेषा म्हणजे काय?
वणवे रोखण्यासाठी किंवा खाजगी जागेतून आग वनात जाऊ नये म्हणून वन विभाग व काही निसर्ग संवर्धक जाळपट्टे काढतात. वनांच्या हद्दी व भौगोलिक क्षेत्र विचारात घेता वनांच्या मधूनही जाळपट्टे किंवा अग्निप्रतिबंधक जाळरेषा काढतात. जाळरेषा 3 ते 4 मीटर रुंदीची असते यात 3 ते 4 मीटर रुंदीतील गवत जाळले जाते. साधारणतः गवत वाळल्यावर ही रेषा काढली जाते

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.