आतापर्यंत दीड कोटींच्या “वाढीव’ बिलांचा परतावा

करोना बाधित 491 जणांनी केल्या आहेत तक्रारी

पुणे  – करोनावरील उपचारातून जादा बिल आकारल्याप्रकरणी आलेल्या 491 तक्रारींमधून सुमारे दीड कोटी रुपयांची बिले महापालिकेने रुग्णांना कमी करून दिली आहेत. सहायक आरोग्य प्रमुख डॉ. मनिषा नाईक यांनी याविषयी माहिती दिली.

 

करोना बाधितांवर उपचार करताना खाजगी हॉस्पिटलकडून होणाऱ्या अवाजवी बिल आकारणीवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिकेकडून, या बिलांसदर्भात तक्रारी आल्यास त्याचे थर्ड पार्टी ऑडिट करून ती रक्कम कमी करण्यासाठी पथकच नेमले आहे. या प्रक्रियेत आत्तापर्यंत 491 तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने तब्बल 1 कोटी 49 लाख 69 हजार 909 रूपये कमी केले आहेत.

 

दीड लाख रुपयांच्या पुढे बिल झाले तर त्याचे ऑडिट करण्यात येत आहे. करोनाबाधितांवर उपचार करताना अवाजवी बिल आकारणी केल्याच्या दि.14 ऑगस्ट ते 23 सप्टेंबरपर्यंत 491 तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत, यापैकी 318 बिलांची तपासणी पूर्ण झाली आहे.

 

एकूण प्रकरणांमध्ये 8 कोटी 85 लाख 9 हजार 911 रूपये इतकी मूळ बिलांची रक्कम आहे. यापैकी महापालिकेने 1 कोटी 49 लाख 69 हजार 909 रूपये कमी केले असून, कमी झालेल्या बिलांची रक्कम 7 कोटी 35 लाख 40 हजार 812 रुपये इतकी आहे.  बिल आकारणीसंदर्भात काही तक्रारी असतील तर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.