तो रस्ता तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलन करू

भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांचा इशारा

केंदूर (पुणे) – करंदी फाटा ते तळेगाव ढमढेरे या नऊ किलोमीटरच्या रस्त्याची एका वर्षात चाळण झाली आहे. या रस्त्याने प्रवास करणे मुश्‍किल झाल्याने वारंवार अधिकाऱ्यांकडे रस्त्याबाबत पाठपुरावा केला, कंत्राटदारानेदेखील वारंवार पुढचा दिवस दाखवला. येत्या दोन दिवसांत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संबधित कंत्राटदाराने सुरू करावे, अन्यथा या रस्त्यावर आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, रोहित खैरे, बाबासाहेब दरेकर, सागर दरेकर यांनी दिला आहे.

करंदी फाटा ते तळेगाव ढमढेरे हा नऊ किलोमीटरचा रस्ता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या माध्यमातून 13 कोटी रुपये खर्च करून एक वर्षांपूर्वी पूर्ण झाला. काम पूर्ण झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यातच हा रस्ता खचला होता. अनेक खड्डे देखील पडले होते. त्यानंतर त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली, मात्र एक वर्षानंतर पुन्हा या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाच काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रारी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, सागर दरेकर आणि स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. मात्र त्या तक्रारींना अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. या रस्त्याच्या दुतर्फा औद्योगिक कारखाने आहेत.

त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम आणि खेड तालुक्‍याच्या पूर्व भागातील नागरिकांना काही दिवसांपूर्वी सुखकर वाटणारा रस्ता आता धोकादायक ठरू लागला आहे. दरम्यान निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून आणि घाई घाईत या रस्त्याचे काम पूर्ण केल्याने या रस्त्याची अशी दुरवस्था झाली असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्‍त केले.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारी खोदून केबल गाडून नेल्यामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे, तशी केबलसाठी खोदकाम करणाऱ्यांवर पोलीस तक्रार केली आहे.
– तुकाराम देवकर, कंत्राटदार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.