आमदार, अधिकाऱ्यांनी केली पाहणी; चार महिन्यांत काम पूर्ण करणार
– हर्षद कटारिया
बिबवेवाडी – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वतीवरील धोकादायक टाक्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम साधारपणे चार महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. तर जनता वसाहत येथील सर्व्हे
नं. 107 येथील टाकीचे काम निधी मंजूर होताच नव्या टेक्नॉलॉजीनुसार टप्याटप्याने करण्यात येणार आहे, यासाठीही प्रयत्नशील असल्याचे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
पर्वती येथील धोकादायक टाक्यांच्या कामाची पाहणी करून सदर काम तातडीने पूर्ण करण्याबाबत आमदार माधुरी मिसाळ यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या टाक्यांच्या दुरुस्तीचे कामे आधुनिक पद्धतीने सुरू करण्यात आल्याने या कामाची माहितीही आमदारांनी घेतली. यावेळी आमदार मिसाळ यांच्यासह अनिरुद्ध पावसकर, नंदकिशोर जगताप, सतीश जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पाण्याच्या टाक्यांलगत असलेल्या घरांना धोका तसेच अनेक वर्षांपासून पालिका प्रशासन, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचे याकडे होणारे दुर्लक्ष “प्रभात’ने दि. 27 नोव्हेंबर 2020ला चव्हाट्यावर आणले होते. टाक्यांच्या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याने या बातम्यांची दखल मंत्रालय पातळीवरही घेण्यात आली. यातून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आयुक्तांना सूचना केल्या होत्या. अखेर यापार्श्वभूमीवर या टाक्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
पाहणीवेळीही “प्रभात’च्या बातमीचीच चर्चा…
या येथील कामाची माहिती देत असताना पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी “प्रभात’च्या बातम्यांचा उल्लेख करत होते. बातम्यांतील सविस्तर माहितीच्या आधारे या कामाचे स्वरूप अधिकारी समाजावून सांगत होते. यासह येथील नागरिकांतही “प्रभात’च्या बातमीचीच चर्चा होती.
टाक्यांचे काम सुरू झाले याचे खरे श्रेय “प्रभात’ला आहे. टाक्यांचे काम सुरू केले आहे, याचे स्वागत आहे. परंतु, वसाहतीतील नागरिकांचे जीव धोक्यात असून प्रशासनाने पुढील काळात येथे नव्या टाक्या बांधाव्यात.
– सूरज लोखंडे, विभाग प्रमुख पर्वती, शिवसेना