विसर्जन मार्गावर खड्डे दुरुस्ती सुरू; पण…

पुणे – शहरातील प्रमुख विसर्जन मार्गांवरील खड्डे दुरुस्ती महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. पावसाने बहुतांश रस्त्यांची चाळण झाली असून यामुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळे येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हे काम सुरू आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस सुरूच आहे. यामुळे रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले असून त्यामुळे वाहतूकही संथ झाली आहे. त्यातच आता गणेश विसर्जन अवघ्या चार दिवसांवर आले असल्याने हे रस्ते दुरूस्त न झाल्यास विसर्जन मिरवणुकीला अडथळे निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

शहरातील विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख रस्ते तसेच महापालिकेकडून नदीकाठ, विसर्जन हौद उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात, कर्वेरस्ता, लक्ष्मीरस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, नगर रस्ता, नेहरू रस्ता या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी स्वतंत्र पथके नेमले असून युद्धपातळीवर हे रस्ते दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, काही ठिकाणी अडथळे कायम असून ते हटविण्याची गरज आहे.

गणेशोत्सवानंतर शहरात दुरुस्ती
गणेशोत्सवापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, उत्सव सुरू झाल्यानंतर पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीत अडचणी येत आहेत. दिवसा वाहतूक कोंडी आणि रात्री पावासामुळे रस्ते दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे पावसाच्या उघडीपीनंतरर ही दुरुस्ती सुरू आहे. तर, गणेशोत्सव संपल्यानंतर शहरातील इतर रस्त्यांची दुरूस्ती केली जाणार असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.

विसर्जन मार्गावरील खड्डे दुरूस्ती सुरू आहे. युद्धपातळीवर हे काम हाती घेण्यात आले असून पुढील दोन दिवसांत ते पूर्ण करण्यात येईल. विसर्जनामुळे प्रभावित होणाऱ्या शहरातील अंतर्गत रस्त्यावरही डागडुजीचे काम सुरू आहे.
– अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख.

Leave A Reply

Your email address will not be published.