पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मनपा पथ विभागाने रात्री वाहतूक कमी झाल्यानंतर खड्ड्यांची डागडुजी अखेर सुरू केली आहे. शनिवारी आणि रविवारी रात्री सुमारे ८०३ खड्डे बुजवण्यात आले आहेत. सुमारे ३३ ठिकाणी खड्डयांची संख्या जास्त असल्याने संपूर्ण रस्त्यावरच पॅचवर्क करण्यात आलेआहे.
ही माहिती मनपा पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. या खड्डयांची गंभीर दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाची बैठक घेत २४ तासांच्या आत खड्डेमुक्त रस्ते करण्याचे आदेश दिले होते.
त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता महापालिकेने ही दुरुस्ती मोहीम सुरू केली. सध्या दिवसभर रस्त्यांचे सर्वेक्षण केले जात असून, ज्या भागात खड्डे आहेत. त्या भागात रात्रीच्या वेळी नियोजन केले जात आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी पथ विभागाने शहरासाठी ३० पथके नेमली आहेत.
पावसाची उघडीप
मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी दिवसभर उघडीप घेतली. त्यामुळे रस्ते दुरूस्तीच्या कामाला वेग दिला जात आहे. पावसाळ्यात महापालिकेचा हाॅटमिक्स प्लॅंट सतत बंद पडत आहे. तसेच खडी ओली असल्याने डांबराचे मिश्रण रस्त्यांसाठी योग्य ठरत नाही. त्यामुळे पाऊस थांबताच प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.