“समृद्धीच्या कामामुळे खराब झालेले अंतर्गत रस्ते दुरुस्त करा’

कोपरगाव – नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार अंतर्गत तसेच अलीकडेच तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली आहे. त्यामुळे वस्त्यांवरील ग्रामस्थांचा गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व संचालक अरुणराव विठ्ठलराव येवले यांनी केली आहे.

तहसीलदार योगेश चंद्रे यांना याबाबतची माहिती देण्यात आली असून, त्यांनी या बिकट झालेल्या रस्त्यांची पाहणी करत समृद्धी महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदारांना समज दिली. येवले यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त बिपिन कोल्हे यांच्याकडे, तसेच राज्य रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व सार्वजनिक बांधकाम व उपक्रम खात्याच्या मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

येवले म्हणाले, कोपरगाव तालुक्‍यातील दहा गावांतून हा महामार्ग जात आहे. त्यासाठी मागील वर्षी या परिसरातील 355 हेक्‍टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. या रस्त्याची रुंदी चारशे फूट असून, त्यावर माती भराव टाकण्यासाठी समृद्धी महामार्गाचे ठेकेदाराकडून शिवारअंतर्गत रस्त्याचा वापर 15 ते 20 टनी डंपर वाहतुकीसाठी केला जात आहे.

ज्यादा क्षमतेच्या वाहतुकीमुळे शिवाररस्त्यांसह अन्य इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची देखील वाट लागली आहे. त्यातच आठवडाभरापासून पाऊस होत असल्याने वस्त्यांवरील ग्रामस्थांचा गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे ठेकेदारांनी या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.