लंडन – भारतीय महिला संघाने तिन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभूत करत निर्विवाद वर्चस्व राखले. ही मालिका 3-0 अशी जिंकत भारताच्या महिला संघाने या सामन्याद्वारे निवृत्त झालेल्या भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला मालिका विजयाचे खास गिफ्ट दिले.
A clean sweep 👍
A historic win at the Lord’s 👌
A special 3-0 ODI series win for #TeamIndia 👏#ENGvIND pic.twitter.com/LxqStg7cgJ
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2022
या सामन्यात इंग्लंडची कर्णधार ऍमी जोन्सने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्यावेळी भारताच्या प्रमुख फलंदाजांनी निराशाजनक सुरुवात केली. शफाली वर्मा, यस्तिका भाटीया, कर्णधार हरमनप्रीत कौर व हर्लिन देओल यांनी साफ निराशा केली. त्यामुळे भारताची स्थिती एकवेळ 4 बाद 29 अशी बिकट बनली. मात्र, एका बाजूने किल्ला लढवत असलेली सलामीवीर व स्टार फलंदाज स्मृती मानधनाने अफलातून अर्धशतकी खेळी केली. तिने दीप्ती शर्मासह डाव सावरला.
अर्धशतकानंतर स्मृती लगेचच बाद झाली. तिने आपल्या 50 धावांच्या खेळीत 79 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार फटकावले. दीप्तीने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतकी पल्ला पार केला. त्यानंतरही तिने धावांचा वेग वाढवला. दयालन हेमलताही साफ अपयशी ठरली. अखेर पुजा वस्त्रकारने थोडीफार चमक दाखवताना 22 धावाची खेळी केली. दीप्तीने संघाला दीडशतकी धावांच्याही पुडे मजल मारून दिली. तिने आपल्या नाबाद 68 धावांच्या खेळीत 106 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार फटकावले. भारताचा डाव 45.4 षटकांत 169 धावांवर संपूष्टात आला. इंग्लंडकडून केट क्रॉसने 4 गडी बाद केले. तिला साथ देताना फ्रेया केम्प व सोफी एक्केलस्टोन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
झुलनला गार्ड ऑफ ऑनर
देदीप्यमान कारकीर्द घडवलेल्या झुलनने या सामन्यात दोन गडी बाद करत आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामनाही गाजवला. या सामन्यासाठी मैदानावर उतरताना तिला दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनरही दिला. तसेच भारतीय संघातील सहकारी खेळाडूंनी तिला खांद्यावर उचलून घेत तिला एक ग्रॅण्ड फेअरवेलही दिले. यावेळी झुलनसह सहकारी खेळाडूंनाही आपले आश्रु रोखणे कठीण बनले होते.
विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या डावाची सुरुवात फारशी समाधानकारक झाली नाही. त्यांच्याही टॅमी ब्युमोन्ट, सोफिया डन्कले, एलिस कॅप्सीडॅनियल वॅट यांनी साफ निराशा केली. इमा लॅम्बने 21 धावांची खेळी केली. तर प्रमुख फलंदाज बाद जाल्यावर कर्णधार ऍमी जोन्सनेही थोडीफार चमक दाखवताना 28 धावांची खेळी केली. मात्र, त्याचवेळी शार्लोट डीनने 47 धावांची वेगवान खेळी करत संघाचा विजय दृष्टिपथात आणला होता. मात्र, तिला दीप्ती शर्माने मांकडिंग पद्धतीने बाद केले व तिथेच इंग्लंडचा पराभव निश्चित झाला. हा सामना 16 धावांनी जिंकत भारतीय संघाने यजमान इंग्लंडला त्यांच्याच देशात व्हाइटवॉश देण्याचा इतिहास रचला. इंग्लंडचा डाव 43.3 षटकांत 153 धावांवर संपूष्टात आला. भारताकडून रेणूका सिंगने 4 गडी बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीची वाताहत केली. आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या वोगवान गोलंदाज झुलन गोस्वामी व राजेश्वरी गायकवाने प्रत्येकी 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक – भारत – 45.4 षटकांत सर्वबाद 169 धावा. (स्मृती मानधना 50, पुजा वस्त्रकार 22, दीप्ती शर्मा नाबाद 68, केट क्रॉस 4-26, फ्रेया केम्प 2-24, सोफी एक्केलस्टोन 2-27). इंग्लंड – 43.3 षटकांत सर्वबाद 153 धावा. (शार्लोट डीन 47, ऍमी जोन्स 28, इमा लॅम्ब 21, रेणूका सिंग 4-29, झुलन गोस्वामी 2-30, राजेश्वरी गायकवाड 2-38).