सातारा – ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय ७९) यांचे आज पहाटे चार वाजता कोविड न्यूमोनियामुळे निधन झाले. आशालता यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणेंनी ट्विट करत आशालतांना श्रद्धांजली वाहिली.
आज फार हतबल झाल्ये. कोविडनी एक अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला. आशालता ताईं अनंतात विलीन झाल्या. अत्यंत मायाळू, प्रेमळ, संवेदनशील, उत्तम कलाकार. मला नेहमीच “बाळा” म्हणत आशीर्वाद देणाऱ्या आशालता ताईच्या आत्म्याला शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏽🙏🏽
— Renuka Shahane (@renukash) September 22, 2020
‘आज फार हतबल झालेय. कोविडने एका अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला. आशालता ताई अनंतात विलीन झाल्या. अत्यंत मायाळू, प्रेमळ, संवेदनशील, उत्तम कलाकार. मला नेहमीच बाळा म्हणत आशीर्वाद देणाऱ्या आशालता ताईंच्या आत्म्याला शांती लाभो’, अशा शब्दांत रेणुका यांनी भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, एका वाहिनीवर काळूबाई मालिका सुरु आहे. या मालिकेचे चित्रिकरण जिल्ह्यात सुरु होते. चित्रिकरणादरम्यान मुंबईतील काही नर्तक कलाकार एक दिवस सहभागी झाले होते. त्यावेळी मालिकेतील काही कलाकारांना करोनाची लागण झाली होती. त्यामध्ये आशालता यांचाही समावेश होता. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते. आशालता यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या.