घरभाडे उत्पन्नवाढीच्या टिप्स

जर आपल्याकडे एकापेक्षा अधिक मालमत्ता असेल तर आणि आपले घर गरजेपेक्षा अधिक मोठे असेल तर रिकाम्या भागास भाड्याने देऊन नियमित उत्पन्नाचा स्रोत म्हणून त्याचा उपयोग करता येईल. भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नाच्या फॉर्म्यूल्याचा विचार केल्यास जर आपली मालमत्ता एक कोटीची असेल तर वार्षिक भाडे किमान तीन लाख येणे अपेक्षित आहे. म्हणजेच दरमहा 25 हजार भाडे असणे गरजेचे आहे.

आपली मालमत्ता चांगल्या स्थितीत असेल तर आपण दीर्घकाळासाठी नियमित उत्पन्न मिळवू शकतो. तसे पाहिले तर प्रत्येक जण राहण्यासाठीच मालमत्तेत गुंतवणूक करतो असे नाही. काही जण गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातही मालमत्ता खरेदी करतात. ती मालमत्ता भाड्याने देऊन उत्पन्नाचा स्त्रोत तयार करतात. एकीकडे मालमत्तेची किंमत वाढत जाते, त्याप्रमाणात भाडेही वाढविता येते. अर्थात प्रत्येकवेळी मालमत्तेतून चांगले भाडे मिळेलच याची खात्री नाही. मालमत्तेच्या स्थितीवर चांगले भाडे अवलंबून असते. भाड्यातून उत्पन्न अधिकाधिक कसे मिळवावे, यासाठी इथे काही टिप्स सांगता येतील.

किती मिळेल भाडे
मालमत्तेत गुंतवणूक करताना त्यापासून आपल्याला किती भाडे मिळेल, याचे आकलन करायला हवे. साधशरणपणे मालमत्तेचे भाडे हे लोकेशन, शहर आणि लोकसंख्येवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे निवासी प्रकल्पाच्या तुलनेत कर्मिशयल मालमत्तेतून भाडे अधिक मिळते. मात्र कमर्शियल मालमत्तेवर कर आकारला जातो आणि सहजासहजी कर्ज मिळत नाही.

हा फॉर्म्यूला
भाड्याचे आकलन करण्यासाठी एक सोपा फॉर्म्यूला आहे. एका वर्षात मालमत्तेच्या तीन टक्के भाडे मिळणे गरजेचे आहे. जर आपल्या मालमत्तेचे मूल्य 50 लाख असेल तर वार्षिक दीड लाख रुपये भाडे मिळायला हवे. म्हणजेच दरमहा सरासरी दहा ते 12 हजार रुपये भाडे मिळणे अपेक्षित आहे.

खर्चाकडे लक्ष
आपण जेवढे भाडे घेतो, ते उत्पन्न म्हणून गृहित धरणे चुकीचे आहे. कारण आपल्याला घराच्या देखभालीवर देखील खर्च करावा लागतो. मालमत्तेचे वय, आकार, बांधकामाची गुणवत्ता, सोयी सुविधा या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला भाड्याच्या उत्पन्नाचे दहा टक्के खर्च हा देखभालीवर करावा लागतो. जर आपली मालमत्ता उत्तम स्थितीत असेल तर दीर्घकाळपर्यंत आपण चांगली कमाई करू शकतो.

घर रिकामेही राहू शकते
प्रत्येक वेळेत आणि काळात आपले घर भाड्याने गेलेले असेलच असे नाही. ते रिकामे देखील राहू शकते. जर आपली मालमत्ता एका वर्षात दोन महिन्यापेक्षा अधिक काळ रिकामी राहत असेल तर आपले उत्पन्न त्याप्रमाणात कमी होईल. म्हणूनच भाडेकरू घर सोडण्यापूर्वी नवीन भाडेकरूचा शोध घेणे शहाणपणा ठरतो.

गृहकर्ज असेल तर
भाड्याने दिलेल्या घरावर गृहकर्ज असेल तर आपल्याला व्याजाचाही विचार करावा लागतो. मालमत्ता खरेदी करताना कमी व्याजावर कर्ज घेणाऱ्या बॅंकाकडूनच गृहकर्ज घेण्याबाबत आपण आग्रही असावे.

Leave A Reply

Your email address will not be published.