पुणे – मुंबईमध्ये भाड्याने फ्लॅट मिळवून देतो, असे सांगून डिपॉझिट व ऍडव्हान्स भाडेपोटी पैसे घेऊन 3 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत बाळासाहेब विठ्ठलराव तिडके (रा. कोपरी कॉलनी, ठाणे) यांनी तक्रार दिली. यावरून सायबर पोलिसांनी मनोज ऊर्फ अभिजित मोहन शिनगार (रा. बाणेर), नेहा कुलकर्णी (इंस्टाग्राम अकाऊंट धारक) यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला.
तक्रारदार तिडके यांना आरोपींनी जानेवारी 2020 मध्ये मुंबईत फ्लॅट भाड्याने देतो, असे सांगितले. त्यासाठी डिपॉझिट व ऍडव्हान्स घरभाडे देण्यास सांगितले. त्यानंतर नेहा कुलकर्णी या नावाच्या बनावट इंस्टाग्राम अकांऊटवरून ही मुलगी आहे, असे भासवून त्यांनी तक्रारदार यांच्याशी संवाद साधला.
त्यानंतर वेगवेगळ्या कारणासाठी त्यांच्याकडून 1 लाख 5 हजार रुपये, तर त्यानंतर अडीच लाख रुपये रोख देण्यास भाग पाडले. पैसे घेऊनदेखील तक्रारदार यांना भाड्याने फ्लॅट दिला नाही. तसेच दिलेली रक्कमदेखील परत न करता 3 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे अखेर तक्रारदार तिडके पोलिसांकडे धाव घेतली.