मुंबई – आज सकाळी प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांची प्राणज्योत मालवली. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा आहेत. संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे अशी पंडित शिवकुमार यांची ओळख होती.शिवकुमार शर्मा यांनी १९६७ साली बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित बृजभूषण काबरा यांच्यासोबत केलेला अल्बम ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा शास्त्रीय संगीतातला एक प्रसिद्ध अल्बम आहे.
पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत अनेकवेळा संगीत दिल्यामुळे या जोडीला शिव-हरी या नावाने प्रसिद्धी मिळाली. दरम्यान काही दिवसातच या जोडीचा एक कार्यक्रम होणार होता. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारत भवन या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
शिवकुमार शर्मा यांच्या विषयी थोडक्यात
शिवकुमार शर्मा हे उत्तम गायकही होते. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं. १९८५ मध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांना बाल्टिमोर या संयुक्त राज्याचं मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आलं आहे.