पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – येथील प्रसिद्ध उद्योजक आणि जैन समाजातील प्रखर मुनीभक्त तसेच अनेक समाज संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त जितेंद्र फुलचंद शहा यांचे मंगळवारी (दि. ६ अॉगस्ट) अल्प आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दक्षिण भारत जैन सभेचे ते पुणे विभागाचे महामंत्री होते. तसेच ते पार्श्व आॅटोचे संस्थापक होते, आणि पुण्यातील बजाजचे दुसऱ्या क्रमांकाचे डीलर होते.
बावधन येथील तपोवन सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानी शहा यांच्या पार्थिवाचे समाजातील विविध मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. सायंकाळी पाच वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील लोक, नातेवाईक, स्नेहीजन उपस्थित होते.
उठामणा बुधवार, दि. ७ अॉगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मॉडेल कॉलनी येथील एचएनडी जैन बोर्डिंग येथे होईल. तसेच गुरुवार, दि. ८ अॉगस्ट रोजी बावधन येथील तपोवन सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल.
माझे स्नेही आणि सहकारी जितेंद्र शहा (पुणे) यांच्या निधनाची वार्ता कळली. उद्योग व्यवसायाबरोबरच सामाजिक भान जपणारा जैन समाजाचा एक मनमिळाऊ कार्यकर्ता आपणास सोडून गेला.
पुण्यात अनेक सामाजिक उपक्रमांत आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात सहभागी होणारा एक सच्चा कार्यकर्ता हरपला. त्यांच्या जाण्याने शहा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात मी व माझे कुटुंबीय सहभागी आहोत. – श्रीनिवास पाटील, माजी राज्यपाल-सिक्कीम तथा माजी खासदार
जितेंद्र शहा हे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते तसेच मुनीभक्त होते. धार्मिक कार्यासाठी देशभर त्यांची भ्रमंती असायची. सर्वांना मदत करण्याची त्यांची वृत्ती होती. पुण्यात कोणाला अडचण आली तर सर्वप्रथम सगळ्यांना जितेंद्रभाईंची आठवण होत असे.
अशी कणखर तब्येत असलेली व्यक्ती अचानक आपल्यातून गेली आहे. जैन समाजाचे आणि सर्व समाजाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. – चकोर गांधी, विश्वस्त, एचएनडी जैन बोर्डिंग
जितेंद्र शहा हे माझे गेल्या ५०-५२ वर्षांचे जुने बंधुतुल्य मित्र होते. ते काॅंग्रेसच्या चळवळीतील माझे जुना सहकारीही होते. अलिकडच्या काळात सक्रीय नव्हते, परंतु ते निष्ठावंत काॅंग्रेस कार्यकर्ते होते.
माझ्यावर मनस्वी प्रेम करणारे, खूप मदत करणारे जितेंद्र शहा हे समाजातील कोणत्याही घटकात म्हणजे क्रीडा क्षेत्र असेल, राजकारण, समाजकारण असेल, अध्यात्म असेल त्यात त्याचे कार्य होते.
दिगंबर जैन समाजाचे नामवंत मुनी आले, की प्रत्येकवेळी तो मला त्यांच्या दर्शनासाठी घेऊन जात असे. चौफेर, निष्ठा आणि माणुसकी, मैत्र जपणारा असे ते व्यक्तीमत्त्व होते. – उल्हास पवार, ज्येष्ठ नेते, कॉंग्रेस