सातारा – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आणि स्वराज्यविस्तारक अशी सार्थ बिरुदावली मिळवलेले स्वराज्याचे तिसरे छत्रपती हिंदू नृपती छत्रपती शाहू महाराजांच्या संगम माहुली- सातारा येथील समाधीला तब्बल 270 व्या वर्षी लोकसहभागातून झळाळी मिळाली असून तिचा लोकार्पण सोहळा मंगळवार, दि. 15 रोजी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होत आहे.
या समाधीचे मूळ स्थान हे नदी पात्रात 9 फूट खोल आहे. वालुकामय स्थितीमुळे समाधीस पाया नाही. मात्र या मूळ समाधीचे बांधकाम करणाऱ्या तत्कालीन स्थापत्यशास्त्रज्ञाने समाधीचा पाया 9 इंच लांब आणि 9 इंच रुंद अशा फोटोफ्रेमसारख्या शिसवाच्या चौकटीवर हे बांधकाम केले आहे. गेल्या 270 वर्षात या समाधीच्या मूळ बांधकामाला तसूभरही धक्का लागलेला नाही. पुनर्निर्माण करतानाही या मूळ बांधकामास धक्का न लावता समाधीस्थानाच्या मूळ शिसवी चौकटीपासून 5 फुटापर्यंत मजबुतीकरण करण्यात आले आहे. त्या पाच फुटांवर आरसीसी बांधकाम करून त्या आरसीसी बांधकामावर आरसीसी खांब उभे करून बाजूने दगडीकाम केले आहे. म्हणजे या समाधीस्थळाचे मजबुतीकरण, आरसीसी बांधकाम आणि त्यावर दगडी घडीव बांधकाम अशा तीन पद्धतीने काम करण्यात आले आहे.
समाधीस्थानाचा चबुतरा हा 11 फूट लांब आणि 11 फूट रुंद आहे. पूर्ण बांधकाम हे 22 फूट उंच आहे. विशेष म्हणजे या समाधीचे पुनर्निमाण सुरू असताना 2019 साली सलग तीन दिवस ही समाधी पाण्याखाली गेली होती. तर 2020 साली अर्धे बांधकाम पाण्याखाली गेले होते. परंतु पुराच्या पाण्याचा काहीही परिणाम या समाधीवर झालेला नाही.
जिर्णोद्धार करण्यात आलेल्या या समाधीची जी सावली पडते ती सावली हुबेहूब रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थानासारखी आहे. या समाधीचे छत छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूर येथील समाधीसारखेच तयार करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी या समाधीवर अत्यंत देखणी अशी प्रकाश योजना करण्यात आली आहे.