पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ठ आव्हानात्मक

निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

न्युयॉर्क  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014-25 सालापर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स इतकी करण्याचे उद्दीष्ठ जाहीर केले आहे. सध्याच्या घडीला हे उद्दीष्ठ साध्य करणे आव्हानात्मक आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. तथापी हे उद्दीष्ठ साध्य करणे अशक्‍य नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.

कोलंबिया विद्यापीठाच्या स्कुल ऑफ इंटरनॅशनल ऍन्ड पब्लिक अफेयर्स च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देश आर्थिक विकास वेगाने साधत असल्याचा दावाहीं त्यांनी केला.

आम्ही सत्तेवर आल्यापासून देशाच्या अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलर्सची भर घातली असे त्यांनी नमूद केले. गेल्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था 2.7 ट्रिलियन डॉलर्स इतकी झाली आहे असे त्या म्हणाल्या. येत्या चारपाच वर्षात आम्हाला ही अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन पर्यंत न्यायची आहे. हे करणे आव्हानात्मक असले तरी अवघड नाही. तसे झाले तर भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती ठरेल असे त्या म्हणाल्या.

भारतात गेल्या पाच वर्षात महागाईचा दर 4.5 टक्‍क्‍यांवरून 3.4 टक्के इतका खाली आला आहे. देशातील गुंतवणुकीला चालना देण्याची गरज आहे असे नमूद करून त्या म्हणाल्या की सध्याची गुंतवणुकीचे प्रमाण 29 टक्‍क्‍यांवरून 36 टक्के इतके करण्याची गरज आहे. भारतात सलग पाच तिमाहीत विकास दर घटत असला तरी आम्ही चालू अर्थिक वर्षातील विकास दराचे वाढीव उद्दीष्ठ कमी केलेले नाही असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

अन्य जागतिक संस्थांनी चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी राहणार असल्याचे भाकीत आत्ताच केले आहे. पण आम्ही चांगल्या दराचे प्रयत्न सोडलेले नाहीत असे त्या म्हणाल्या. सरकारने कंपनी करात कपात करण्यासह अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याची माहिेतीहीं अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.