पालकमंत्री हटाव; विखेंवर जबाबदारी सोपवा

File Photo

-मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन : ना. शिंदे जिल्ह्यासाठी कुचकामी ठरले
-प्रकाश मेहतांना कुचकामी ठरल्याने डच्चू देण्यात आला
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठविले निवेदन 

नगर  – निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू देण्याच्या भाजपच्या निर्णयाचे मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, प्रा. राम शिंदे यांना पालकमंत्री पदापासून हटवून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती ऍड.कारभारी गवळी यांनी दिली.

महाराष्ट्राचे मागील गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहेता निष्क्रीय व भ्रष्टाचारी ठरल्याने त्यांना डच्चू देण्यात आले. हे खाते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले असून, घरकूल वंचितांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. येत्या विधानसभा निवडणुकिच्या पुर्वी घरकूल वंचितांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यास न्याय मिळणार असल्याची अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

तर पालकमंत्री प्रा. राम शिंदे अहमदनगर जिल्ह्यासाठी कुचकामी ठरले आहेत. त्यांच्या मतदारसंघा पुरतेच मंत्री ठरले असून, त्यांनी इतर भागाकडे लक्ष दिले नाही. घरकूल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी एकदाही बैठक घेतली नाही व यावर उपाययोजना देखील केल्या नाहीत. प्रा. शिंदे यांच्याकडून इतर खाते काढून घेण्यात आले ही चांगली गोष्ट झाली आहे. दुष्काळात जलसंधारणाची कामे करण्याऐवजी त्यांनी जिल्हा विभाजनाचा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा वाटला. पालक मंत्र्यांचा जिल्हा प्रशासनावर वचक नसल्याने अनेक विकासकामे रेंगाळली असल्याचा संघटनेच्या वतीने आरोप करण्यात आला आहे. तर पालकमंत्री पदाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील हे सक्षमपणे पेलणार असल्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. ना.विखे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते असून, त्यांचा दांडगा अनुभव आहे. तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक असून, याचा फायदा जिल्ह्यासाठी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)