शिंदवणे येथील घटना : शेतकरी चिंताग्रस्त
लोणी काळभोर -शिंदवणे (ता. हवेली) येथील शेतात विक्रीसाठी काढून ढीग लावून ठेवलेला सत्तर हजार रुपयांचा 3500 किलो कांदा अज्ञात चोरट्यांनी चार चाकी गाडीतून चोरुन चोरुन नेण्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात रामदास कुंडलिक कड (वय 58, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी तक्रार दाखल केली आहे.
रामदास कड यांची शिंदवणे गावच्या हद्दीत शितोळे मळ्याजवळ दोन एकर शेती आहे. ही शेती त्यांचा मुलगा भाऊसाहेब रामदास कड यांच्या नावावर आहे. जमीनीमध्ये कांद्याचे पीक केलेले आहे. दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच दरम्यान महिला व पुरूष मजूर लावून अर्धा एकर क्षेत्रातील कांदा काडून घेतला. त्यानंतर कांद्याची पात कापून शेतात कांद्याचा ढिग लावून त्यावर काढलेल्या कांद्याची पात टाकून झाकून ठेवलेला होता.
सकाळी दहा वाजता उर्वरित कांदा काढण्यासाठी रामदास कड मजुरांसह गेले. त्यावेळी कांद्याच्या पातीने झाकन ठेवलेला ढिग कमी झालेला दिसला. त्यामुळे त्यांनी आजूबाजुला पाहिले असता चारचाकी वाहनाचे टायरचे चिन्ह दिसले. त्याठिकाणी काळ्या- लाल रंगाची बॅटरी पडलेली दिसली. त्यामुळे त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.