मुंबई: मुंबई महापालिका उपायुक्त निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नोटांवरुन फोटो काढून टाका, जगभरातील त्यांचे पुतळे हटवा, असे वादग्रस्त ट्विट केले. निधी चौधरी या प्रशासकीय अधिकारी असून त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या पदावरुन हटवावे, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली आहे. निधी चौधरी यांच्या विरोधात बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रांगणात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आंदोलन करण्यात आले.
‘राष्ट्रपिता का ये अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान’ असा नारा देत निधी चौधरी यांचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात मुंबई महापलिकेच्या गटनेत्या राखी जाधव, नगरसेविका मनीशा रहाटे, नगरसेविका डॉ. सईदा आणि समस्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत निधी चौधरी यांनी फेसबुकवर आपली भुमीका स्पष्ट केली असून मी केलेलं ट्विट एक व्यंग्यात्मक टिप्पणी असल्याचे म्हटले आहे.