नेवासा – नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे नेहमीच्या वाढत्या रहदारीमुळे अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली असून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत बाप-लेकांचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना नुकतीच नेवासा फाटा येथे घडलेली आहे.
येथील व्यावसायिकांची दुकानेही आता थेट महामार्गावरील रस्त्यावर आलेली आहेत. या अतिक्रमणाबाबत जिल्हा प्रशासन मात्र ठोस भूमिका घेत नसल्यामुळे नेवासा फाटा येथील राजमुद्रा आणि आंबेडकर चौकात दिवसांतून अनेकदा वाहतूक जाम आणि विस्कळीत होत आहे. नेवासा फाटा येथे तातडीने उड्डाणपूल करण्याशिवाय पर्यायच उरला नसून निष्पाप लोकांचे विनाकारण जीव जाणार असतील? तर येथे तातडीने उड्डाणपूल करण्याची मागणी शिवसेना नेते बिट्टूभाऊ लष्करे आणि शिवसेनेचे तालुका उपप्रमुख मुन्ना चक्रनारायण यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौक आणि आंबेडकर चौकात दिवसातून अनेकदा वाहतुक जाम होत असून येथील व्यावसायिकांचे दुकानेही चक्क महामार्गावर आलेली आहेत. अनेकांनी येथे कच्चे-पक्के बांधकामे रस्त्याजवळ करुन वाहतुकीस अडथळा निर्माण केलेला आहे. मात्र जिल्हा प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते लष्करे आणि चक्रनारायण यांनी यावेळी बोलताना केला आहे.
नेवासा फाटा परिसरात वारंवार अपघातांच्या संख्येत वाढ होऊन अनेक जण जीवनभरचे अधू झालेले आहेत, तर अनेक निष्पाप लोकांचा या अपघातात जीव गेला आहे. याकडे जिल्हा प्रशासन मुग गिळून गप्प असल्यामुळे जनतेतून जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महामार्गावरील रस्त्याजवळ थेट अतिक्रमण थाटण्यास या व्यावसायिकांना नेमका कोणाचा ‘राजाश्रम’ लाभला? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्गावरील नियमाप्रमाणे अतिक्रमण काढल्यास वाहतूक कोंडीचा कायमस्वरुपी प्रश्न मिटणार असून जर प्रशासनाला ही अतिक्रमणे काढायची नसेल? तर मात्र नेवासा फाटा येथे उड्डाणपुल करुन निष्पाप लोकांचा जीव या अपघातातून वाचविण्याची मागणीही आता जनतेतून जोर धरु लागली असून शिवसेना नेते बिट्टूभाऊ लष्करे आणि मुन्ना चक्रनारायण यांनी जिल्हा प्रशासनाला येथील अतिक्रमणे हटविण्याची मागणी करत जर अतिक्रमण काढता येत नसतील तर येथे उड्डाणपूल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नेवासा फाटा येथे दररोजच वारंवार वाहतुक जाम होऊन त्यामध्ये घाई गडबडीत अनेक निष्पाप लोंकाचा जीव अपघातात जाणार असेल, तर जिल्हा प्रशासनाने येथील अतिक्रमणे तातडीने काढावीत किंवा उड्डाणपूल तरी करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा गर्भित इशाराही यावेळी लष्करे यांनी दिला आहे.