सातारा, (प्रतिनिधी) – पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी ब्रिटिशांच्या विरुध्द केलेल्या अनेक आंदोलनापैकी एक रोमहर्षक प्रसंग रविवार, दि. 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा येथे घडला. या घटनेस 80 वर्षे पूर्ण झाली आहेत.
त्यानिमित्त क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या सातारा जेलच्या तटावरुन क्रांतिकारक उडीचा शौर्य दिन आज हुत्मामा सहकारी साखर कारखाना वाळवाचे (जि. सांगली) चेअरमन वैभवकाका नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
ब्रिटिशांच्या विरुध्द स्वातंत्र्य सैनिकानी डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र क्रांती केली होती. या क्रांतिमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्शाने सशस्त्र सेना उभी केली.
महात्मा गांधीच्या 1942 साली “करा किंवा मरा” या विचाराने प्रेरणा घेऊन डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी देश स्वतंत्र होईपर्यंत स्वातंत्र्य चळवळ चालू ठेवली.
यामध्ये डॉ. नागनाथअण्णांना ब्रिटिश पोलिसांनी 28 जुलै 1944 रोजी वाळवा येथे अटक करून सातारा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त केले होते. अण्णांनी हा अभेद्य तुरुंग फोडून 18 फुट उंचीच्या जेलच्या तटावरून उडी मारून भूमिगत झाले.
या घटनेने ब्रिटिश सत्तेला हादरा बसला होता, असे वैभव नायकवडी यांनी सांगितले.
दरम्यान, सातारा मध्यवर्ती कारागृह येथे भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये या कारागृहात ज्यांनी बंदीवास भोगला त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ जो स्तंभ उभा केला आहे. त्या ठिकाणी अण्णांचे विचारावर प्रेम करणारे सर्वजण उपस्थित होते.
हा कार्यक्रम पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीच्या वतीने घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, गौतम भोसले, अस्लम तडसडकर, प्रकाश खटावकर, श्याम चिंचणे आधी उपस्थित होते.