स्मरणी : देवमाणूस डेव्ह

श्रीनिवास शारंगपाणी

सल्लागार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना वेगवेगळे लोक भेटतात. त्यातील काही आपल्याला त्यांच्या विनयशील आणि मदत करण्याच्या प्रवृत्तीने चांगलेच लक्षात राहतात. अमेरिकेसारख्या देशात काम करताना तर काही वेळा स्थानिकांच्या वर्णद्वेषी आणि तिरस्कारयुक्‍त वागण्याचा अनुभव येतो आणि आपण जपून वागायला शिकतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी कुणी नम्रतेनं आणि मदत करण्याच्या वृत्तीनं तुमच्या सान्निध्यात आला, तर तप्त वातावरणात एखादी शीतल झुळूक अंगावर यावी तसा अनुभव येतो.

2012 मध्ये अमेरिकेतील आयोवा राज्यातील सेडार फॉल्स या गावी मी आणि माझी 8-10 जणांची टीम एका हॉटेलात राहात होतो. आम्हाला तिथून रोज सुमारे 13 कि.मी. मोटारगाडीनं प्रवास करून वॉटर्लू येथील एका कारखान्यात जाऊन तीन इंजिनांचा तौलनिक अभ्यास करण्याचं काम करायचे होते आणि हे काम आठवड्यातून पाच दिवस करायचं होतं. आम्ही 2-3 मोटारी भाड्यानं घेतल्या होत्या. रोज आमच्यापैकीच एकजण आलटून-पालटून ड्रायव्हिंग करीत असे.
कारखान्यात अमेरिकन कंपन्यात असतात तशा चांगल्यापैकी सुविधा होत्या. जेवणासाठी दुपारी आम्ही जवळच्याच मॅकडोनाल्ड किंवा सब-वे रेस्टॉरंटमध्ये जात असू. वेळ मिळाल्यास कधी कधी थोडं लांब असलेल्या एका भारतीय हॉटेलमध्येही जात असू.

माझ्याकडे इंजिनाच्या बारीकसारीक भागांपासून मोठ्या भागांची पूर्ण माहिती म्हणजेच त्यांचं आकारमान, योजिलेलं साहित्य, बाग उत्पादन केल्याची पद्धती अभ्यासून नोंद करण्याचं काम होतं. कारखान्यानं लागतील ती सर्व उपकरणं तसंच हाताखाली हेल्परसारखी कामं करण्याकरता काही कामगारही दिले होते. त्यातच वयस्कर असा डेव्ह नावाचा एक कामगार होता.
माझं काम एका टेबलापाशी बसूनच होतं. टेबलाजवळ एक आरामशीर स्टूल होतं त्यावर बसून मी माझं काम करीत असे. सुरुवातीच्या मीटिंगमध्येच मी माझ्या हाताखालील (अमेरिकन) कामगारांना प्रत्येक भाग धुवून, स्वच्छ पुसून टेबलावर मला आणून द्यायला स्पष्टपणे सांगितलं होतं. त्याप्रमाणे काम व्यवस्थित चाललं होतं.

भारतीय इंजिनियरच्या हाताखाली काही अमेरिकन कामगार काम करीत आहेत, ही गोष्टच काहीशी सुखावणारी असली तरी मी त्याबाबत संवेदनशील होतो. मात्र काम वेळेवर पुढं नेणं हेही महत्त्वाचं असल्यानं मी रोज सकाळी होणाऱ्या शॉप मीटिंगमध्ये त्याप्रमाणे सूचना देत होतो.

पहिल्या दिवसापासून मी जिथं काम करीत होतो तिथंच एक छानसं आरामदायी स्टूल होतं. त्यावर बसून माझं काम व्यवस्थित चाललं होतं. दोन-तीन दिवस गेले आणि एके दिवशी सकाळी त्या कंपनीतील एक ऑफिस कर्मचारी माझ्यापाशी आला आणि काहीशा गुर्मीतच म्हणाला, “”हे स्टूल माझं आहे आणि मला ते आताच्या आता परत पाहिजे.”
मला काही कळेना. पण मी त्वरित उत्तरलो, “”नो प्रॉब्लेम. तुम्ही हे “आत्ताच्या आता’ घेऊन जाऊ शकता. हे केवळ इथं होतं म्हणून मी त्यावर बसून काम करीत होतो.” मी उठल्यावर थोडा खजील होऊन तो कर्मचारी ते स्टूल घेऊन निघून गेला. मी उभं राहून माझं काम चालू ठेवलं.

दुसरे दिवशी कामावर आल्या आल्या मला माझ्या टेबलापाशी तसंच एक छानसं स्टूल दिसलं. तरीही उगीच कुठलाही प्रश्‍न उभा राहू नये म्हणून मी उभ्याउभ्याच काम करू लागलो. थोड्या वेळानं डेव्ह तिथं आला आणि त्यानं मला विचारलं, “”तुम्ही उभं राहून काम का करताय? हे स्टूल आहे ना इथं. त्यावर बसून करा ना काम?”

मी म्हणालो, “”कालच असं स्टूल दुसऱ्या कुणाचं होतं ते तो घेऊन गेला. आज पुन्हा तसं काही व्हायला नको म्हणून-”
“”तसं काही होणार नाही. तुम्ही खुशाल बसा आणि शांतपणे काम करा,” डेव्ह हसत म्हणाला.
“”पण-” मी पुढं काही बोलण्याआधीच माझ्या खांद्यावर हात ठेवून डेव्ह म्हणाला, “”हे स्टूल मीच इथं ठेवलंय आणि मी ते माझ्या घरातून घेऊन आलोय. त्यामुळे कुणी काही म्हणायचा प्रश्‍नच येत नाही.”
“”डेव्ह, तुम्ही हे घरून घेऊन आला आहात?”

“”होय, त्यात काय? मी रोज माझ्या ट्रकमधून इथं कामावर येतो. स्टूल मागं हौद्यात टाकलं आणि आलो!” अमेरिकेत लहानशा पिक-अपला ट्रक म्हणतात आणि बरेच लोक त्याचा मोटारगाडीसारखा वापर करतात. डेव्हच्या सहजसुलभ माणुसकीमुळे मी अगदी भारावून गेलो.

काही दिवसांत थंडी सुरू झाली आणि मी एक जॅकेट घालून कामावर येऊ लागलो. एके दिवशी एक इंजिनियर मला इंजिनचा एक भाग दाखवून त्याबद्दल काही विचारू लागला. तो दाखवताना त्यामध्ये अडकलेलं काळं तेल माझ्या जॅकेटवर सांडलं. त्या इंजिनियरला मी तो भाग शिस्तीनं आधी स्वच्छ करून मग मला का दाखवला नाही? असं जरा खडसावून विचारलं. तेवढ्यात डेव्ह तिथ आला आणि तो भाग घेऊन त्यानं काही मिनिटातच स्वच्छ करून आणला. नंतर तो म्हणाला, “”संध्याकाळी ते जॅकेट काढून तुम्ही जाताना माझ्याकडे द्या.”
“”का?”

“”माझी बायको ते मशीनमध्ये घालून धुवून, वाळवून ठेवील आणि मी ते उद्या घेऊन येईन.” डेव्ह सहजपणे म्हणाला.
आता मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, “”त्याची काही गरज नाही, डेव्ह. आम्ही ज्या हॉटेलात राहतो तिथं वॉशिंग मशीनची सुविधा आहे.”

असा हा डेव्ह- कायम मदतीला तत्पर. एकदा क्रेनवरून इंजिन हलवलं जात असताना त्याचा एक कोपरा डेव्हच्या डोक्‍याला लागून जखम झाली आणि भळाभळा रक्‍त येऊ लागलं. या घटनेत खरं तर डेव्हची अजिबात चूक नव्हती. मी सहकाऱ्यांच्या मदतीनं त्याला मलमपट्टी केली आणि म्हटलं, “”चल, आमच्या गाडीतून तुला जवळच्या क्‍लिनिकमध्ये नेतो.” त्यावर हसत डेव्ह म्हणाला, “”आमचं कामच असं असतं. बारीकसारीक जखमा होतातच. विशेष काही नाहीय.” नंतर तो लगेच कामाला लागला सुद्धा.

काही दिवसांनी नाताळचा सण आला. डेव्हनं मला त्याच्या घरी मेजवानीसाठी बोलावलं. पण ते शक्‍य नव्हतं. कारण आम्हाला परतीच्या प्रवासाची तयारी करायची होती. सद्‌गदित अंतःकरणानं डेव्ह मला म्हणाला, “”मी तुमचं काम आणि तुम्हालाही जवळून पाहिलंय. तुम्ही जगभरातल्या कंपन्यांमध्ये सल्लागार या नात्यानं काम करता असं मी ऐकलंय. मला तुमच्या टीममध्ये घ्या. मी तुमच्याबरोबर जगाच्या पाठीवर कुठंही काम करायला तयार आहे. मी तुम्हाला कामाच्या बाबतीत कधीच निराश करणार नाही.”

ते अमेरिकेतील रोजगार समस्येचे दिवस होते. माझं कंपनीबरोबरचं कंत्राटही समाप्त व्हायला आलेलं होतं. पण मला काही काळ अस्वस्थ झालं. एक काळ असा होता की आपले तरुण अमेरिकेत काहीही करून काम करण्यासाठी उत्सुक होते आणि आज हा वयस्क अमेरिकन माझ्या हाताखाली जगात कुठंही काम करायला तयार होता.

Leave A Reply

Your email address will not be published.