स्मरणी – खळाळता निर्झर रतन टाटा

श्रीनिवास शारंगपाणी 

आपण चंद्र दुरून पाहतो तो आपल्याला शांत आणि शीतल भासतो; पण जवळून पाहिल्यावर तो खडबडीत आणि काहीसा उग्र असा दिसून येतो. याउलट एखाद्या वेळी दुरून खळखळाट ऐकला की, मनात भीती आणि गांभीर्याचा उगम होतो. जवळ गेल्यावर मात्र तो एक निर्झर आहे हे लक्षात येतं. हा निर्झर आपल्याला उल्हासित करतो आणि आपली तृष्णाही भागवतो. तसंच काहीसं रतन टाटांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत म्हणता येईल. दुरून काहीसे गंभीर वाटणारे रतन टाटांना जवळून पाहिल्यावर असेच उल्हासित करणारे आणि आपल्याला चालना देणारे वाटू लागतात.

मीही त्यांना दुरून पाहिलं तेव्हा एका कर्मचाऱ्याला आपल्या कंपनीचे सर्वोच्च अधिकारी पाहिल्यावर जे वाटतं तसंच- म्हणजेच एक आदरयुक्‍त दरारा अशी भावना दाटून आली. पण पुढे त्यांच्याबरोबर काम करताना ते मला अतिशय शालीन, विनम्र आणि मानवतेनं परिप्लुत असे दिसून आले. ते खऱ्या अर्थानं माझे मार्गदर्शक झाले.

आव्हानं कशी घ्यायची आणि ती कशी पेलून दाखवायची हे त्यांच्याकडून शिकावं. परदेशी-विशेषतः अमेरिकन आणि युरोपियन अधिकाऱ्यांनी “”हे तुम्हा भारतीय अभियंत्यांना जमायचं नाही, झेपायचं नाही” असं म्हटलं की वरकरणी हलकंस स्मित करणारे टाटा आतून जिद्दीनं पेटून उठत. असाच एक “अशक्‍य’ उपक्रम माझ्या वाट्याला आला. त्याचं कारणही तसंच होतं. एक वरिष्ठ अधिकारी मला सतत पाण्यात पाहत असे. मी या उपक्रमात तोंडघशी पडेन अशी त्याची खात्री होती म्हणून त्यानं माझं नाव सुचवलं. झालं उलटंच. टाटांचा आदर्श बाळगणारा मी तो अतिशय अवघड परिस्थितीत आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं मुद्दाम घातलेल्या अडथळ्यांना पार करून केवळ यशस्वीच करून दाखविला नाही तर युरोपातील अधिकारी वर्गाची वाहवा मिळवली.

त्यानंतर टाटांनी मला अनेक आव्हानात्मक कामं दिली आणि मी त्यांना ठरलेल्या वेळेपूर्वी आणि त्यांच्या पसंतीला पडतील अशा रीतीनं पूर्ण केल्यावर त्यांचा माझ्यावर केवळ विश्‍वासच बसला नाही तर त्यांनी माझ्यावर धाकट्या भावावर करावं तसं प्रेम केलं. एकदा त्यांनी मला विचारलं की तू कुठलंही अवघड काम दिल्यावर त्याचा अभ्यास करतो, बघतो, नीट अभ्यास केल्यावर नंतर सांगीन असं काही न सांगता ठरलेल्या वेळेवर समाधानकारकरीत्या पूर्ण करतोस हे कसं काय? तुला कुठून ऊर्जा मिळते?

त्यावर तुम्हीच माझे स्फूर्तिस्थान आहात आणि त्यातूनच मला सकारात्मक ऊर्जा मिळते असं सांगितल्यावर विनम्रतेचा साक्षात पुतळा असलेल्या टाटांनी ते हसण्यावारी नेलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं की जेव्हा संपूर्ण भारतीय आरेखन असलेल्या मोटारगाडीचा विकास करण्याचा तुम्ही निर्णय घेतलात तेव्हा अनेक माध्यमांनी तुमची केवळ खिल्लीच उडवली नव्हती तर अपमानीतही केलं होतं. तेव्हा तुम्ही तो प्रकल्प केवळ यशस्वीच करून दाखवला नाहीत तर अवघ्या तीन वर्षांत त्या मोटारगाड्यांची युरोपात निर्यात करून दाखवलीत. आता तुम्हीच मला सांगा की हे स्फूर्तिदायक नाही तर काय आहे. तरीही शालीन टाटांनी आपल्या गौरवाचा विषय टाळून दुसरीकडे नेला!

एकदा परीक्षण होत असलेल्या प्रारूप मोटारगाडीला अपघात झाल्यावर गाडीचं मोठं नुकसान झालं. प्रारूप गाड्या बनवण्यास फार मोठा खर्च (कोटींमध्ये) येतो त्यामुळं आम्ही चिंतेत होतो. परंतु, टाटांनी सर्वप्रथम चौकशी केली ती सर्वजण सुरक्षित असल्याची. भर उन्हात परीक्षण मार्गावर जेव्हा त्यांच्यासाठी सॅंडविचसारखे खाद्यपदार्थ आणि ज्यूस येत तेव्हाही ते आम्हा अभियंत्यांना आधी देत आणि मगच स्वतः घेत. माझ्यावर त्यांचा खूपच लोभ होता. परिणामी त्यांनी माझ्या कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्यानुसार आम्ही कुटुंबीय ते वास्तव्य करीत असलेल्या टाटा मोटर्ससमोरील लेक हाऊस येथे भेटावयासही गेलो. सर्वांशी आपुलकीनं बोलून, गप्पा मारता मारता त्यांनी आमच्याबरोबर चहापानही केलं. विशेष म्हणजे एका विदेशी दूरचित्रवाणीचे लोक त्यांची मुलाखत घ्यायला त्यावेळी तिथं आले असता त्या लोकांना त्यांनी माझे मित्र व त्यांचे कुटुंबीय मला भेटायला आले आहेत तेव्हा तुम्हाला काही काळ थांबावं लागेल असं सांगितलं. त्यानंतर “मला तुझ्या घरी यायचं आहे’ असंही त्यांनी मला सांगितलं. एकदा त्याप्रमाणे सगळं ठरलंही परंतु ऐनवेळी त्यांना अचानक महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला तातडीनं परतावं लागलं आणि पुन्हा काही तो योग आला नाही. या सगळ्या गोष्टींवरून रतन टाटा मानवी मूल्यांना किती जपतात हेच अधोरेखित होतं.

एक प्रसंग तर माझ्या मनावर एखाद्या शिलालेखाप्रमाणे कोरला गेला आहे. मला दिलेल्या अतिमहत्त्वाच्या कामाचे नमुने त्यांना दाखवायचे होते. तेव्हा पुण्यातील टाटा समूहामध्ये नुकत्याच सामील झालेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची बैठक चालू होती. माझ्याविरुद्ध असलेल्या वरिष्ठ साहेबांनं “”हे असले नमुने पाहून ते फेकून देतील” असं माझं वैचारिक खच्चीकरण करून मला त्यांच्यापुढे केलं. मात्र, टाटांना माझे नमुने खूपच भावले आणि त्यांनी पुढं काय करायचं याच्या मला सूचना दिल्या. वरिष्ठ साहेबांचा तिळपापड झाला. बैठक संपल्यानं आणि टाटा त्या हॉटेलात प्रथमच आलेले असल्यानं उंची भोजनाची तयारी चालू होती. वरिष्ठ साहेबानं मला अपमानित करून ऑफिसात परत जायला सांगितलं. तथापि, रतन टाटांनी मला बोलावून घेतलं आणि सर्व उच्च अधिकाऱ्यांसमक्ष त्यांच्या शेजारी बसवून जेवायला लावलं. माझ्या डोळ्यात त्यावेळी अश्रू तरळले. मी लेखक आहे हे कळल्यानंतर त्यांनी माझं एक पुस्तक वाचून त्यावर चर्चाही केली आणि माझ्या खोलवर अभ्यास करून लिहिण्याचं कौतुक केलं.

अशा या महामानवाच्या अनेक कथा आहेत; पण त्या सगळ्यांमधून त्यांची मानवतावादी उदार दृष्टी, त्यांची विनम्रता, गुणग्राहकता, स्वदेशीचा अभिमान असेच गुण पाहायला मिळतात. एका युरोपियन अधिकाऱ्यानं एकदा माझ्याजवळ व्यक्‍त केलेली भावना एकाच वाक्‍यात सगळं सांगून जाते. तो म्हणाला, “”रतन टाटा हेच तुमच्या देशाचे राष्ट्रपती व्हावयास योग्य आहेत.”

अलीकडेच मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. काहीसे थकलेले रतन टाटा आजही मनानं तितकेच तरुण आहेत जितके ते वर्षानुवर्षे दिसताहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि भारतीयांना ते कायम मार्गदर्शन करीत राहोत हीच इच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.