एका नथीची आठवण

नवीन वर्षाची खरेदी करण्यासाठी एक जानेवारीला आम्ही लक्ष्मी रोडला गेलो होतो. आम्ही म्हणजे घरातील सर्वजण आणि माझी बहीण तिच्या मुलांसह आली होती. सगळे मिळून चांगले हम सात साथ है म्हणतात तसे सातजण होतो. एकाच गाडीत-गाडी तशी मोठी असली, तरी थोडीशी गर्दी करूनच बसलो. मंडईतील पार्किंगमध्ये गाडी पार्किंग करून झाल्यानंतर तुळशीबागेपासून खरेदी सुरू झाली, ती कपड्यांच्या दुकानापासून होत होत शेवटी खादीकडे गेली. खादी म्हणजे खाण्याचा कार्यक्रम. इतकी खरेदी झाल्यानंतर भूक लागणे अगदी स्वाभाविकच होते. कारण साऱ्या खरेदीत आणि त्यासाठी फिरण्यात चांगले अडीच तीन तास गेलेले होते. मग प्रत्येकाच्या आवडीनुसार खाणेपिणे झाले आणि आम्ही सारे घराकडे जाण्यासाठी परत फिरलो.

परत घरी जात असतानाच लक्ष्मी रोडवर एका चौकातून जात असताना, मला वाटते तो उंबऱ्या गणपती चौक असावा. म्हणजे आम्ही त्याला उंबऱ्या गणपती चौक म्हणत असू. आता कदाचित त्याचे नाव बदलले असावे. नाहीतरी फिरताना चौकांची नावे थोडीच लक्षात ठेवतात? तर त्या चौकातून जात असताना श्रावणी एकदम ओरडली, आई, ती बघ नथ…केवढी मोठी आहे. बघितलीस का?

आम्ही तिने दाखवलेल्या दिशेने पाहिले, (चौकातून गाडी अगदी हळूहळूच चालली होती) तर चौकात खरोखरच एक नथीचे शिल्प होते-हो, शिल्पच म्हटले पाहिजे. दुसरे काय म्हणणार? नथ होती म्हटले तर चालेल का? पण ती नथच होती. मोत्यांची. चांगली मोठ्ठी-नाकापेक्षा मोती जड म्हणावे एवढी मोठी. श्रावणीने दाखवली नसती तर आमचे त्या नथीकडे लक्षही गेले नसते कदाचित. तिने दाखवल्यामुळे आम्ही ती नथ पाहत असताना गाडी पुढे गेली. आणि गाडी पुढे गेली तरी मन मात्र मागे त्या नथीभोवतीच घुटमळत राहिले.

घरी आल्यानंतर मी सर्वप्रथम कपाट उघडले आणि कपाटातील दागिन्यांचा बॉक्‍स बाहेर काढून त्यातील नथ बाहेर काढली. एक छोटी आणि एक मोठी. छोटी नाजूकशी नथ माझीच होती. आणि दुसरी चांगली ठसठशीत असणारी मोठ्ठी भक्कम नथ माझ्या आजीची होती. आजीकडून आईकडे आलेली आणि आईकडून माझ्या मोठ्या बहिणीकडे गेलेली. पण बहिणीने जिवापाड जपलेली ती नथ गेल्या वर्षीच अचानकपणे मला देऊन टाकली होती, उदारपणे, फार मोठ्या मनाने… तशी तिला मी प्रत्यक्ष नाही, पण आडवळणाने-आडून आडून दोनचार वेळा मागून बघितली होती. मात्र तेव्हा तिने तो विषय मोठ्या शिताफीने टाळला होता. आणि तिचे बरोबरच होते. तिच्या जागी मी असते तर मीही तेच केले असते. कारण त्या नथीचे मोल नाही, तर तिच्यामागची भावना महत्त्वाची होती. आमच्या तीन पिढ्यांची आठवण होती ती.

मला स्वतःला नथ घालणे फारसे आवडत नाही. पण तरी ही आईची नथ तिने मला दिली हा मला तिचा फार मोठेपणा वाटला. त्यावेळी मला काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे. तिला तिच्या लग्नात माझ्या आजीची ही नथ मिळाली होती. ती नथ मी माझ्या आजीच्या आणि माझ्या आईच्या नाकातही घातलेली पाहिली होती. नाकात घालत असताना टोचल्यामुळे माझ्या आईच्या चेहऱ्यावर क्षणभर उमटणारी एक अस्पष्ट वेदना आणि त्यानंतर चेहऱ्यावरील आनंद-प्रसन्नता मी पाहिलेली आहे. तिचा नथ घातलेला चेहरा आजही माझ्या नजरेसमोर आहे. सणावाराला किंवा वाढदिवसाला आम्हा भावंडाचे औक्षण करत असताना निरंजनाच्या मंद प्रकाशात तिचा चेहरा आणि खास करून नाकातील नथ अगदी उजळून निघत असे. अगदी पाहत राहवासा वाटत असे. खरं तर तेव्हा आजच्यासारखे मोबाइल कॅमेरे असते तर आम्ही तिचे व्हिडिओ करून ठेवले असते. नथीच्या टपोऱ्या मोत्यांचं तेज तिच्या चेहऱ्यावर पसरत असे. अगदी पाहत राहवेसे वाटे.

ती नथ मी हाती घेतली आणि नाकात घालण्यासाठी हात नाकाकडे नेला. पण नंतर परत मनात विचार आला, आईच्या चेहऱ्याला शोभायची तशी ती नथ माझ्या चेहऱ्याला शोभणार नाही. आणि प्रेमाचा एक दृष्टिक्षेप टाकत मी ती पुन्हा डबीत ठेवली. तो एक प्रेमाचा ठेवा आहे.

योगिता जगदाळे

Leave A Reply

Your email address will not be published.