पुणे – “जम्बो कोविड हॉस्पिटल’मध्ये रेमेडीसिवीर इंजेक्शन मोफत देण्याचा धोरणात्मक निर्णय लोकप्रतिनिधींचा आहे. त्यामुळे त्यांनी तो घेतला तर रुग्णांना हे इंजेक्शन मोफत देण्याची आमची तयारी आहे, अशी माहिती महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
जम्बोमध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी ज्यांना रेमेडीसिवीर इंजेक्शनची गरज असते त्यांना तेथेच इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. जेणेकरून त्यांना बाहेर जाऊन त्याची शोधाशोध करायची किंवा जास्त किंमतीने आणायची गरज नाही. मात्र, त्याची जी किंमत आहे त्याच किंमतीत ते रुग्णांना उपलब्ध करून दिले जात आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.
रेमेडीसिवीरचा तुटवडा जम्बो कोविड हॉस्पिटल अथवा महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात नाही. याचा पुरेसा साठा महापालिकेकडे सरकारने उपलब्ध करून दिल्याचे, अग्रवाल यांनी नमूद केले.
याशिवाय लागणारी औषधे कमी पडली तर ती उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही “मेडिकल असोसिएशन’ने दिल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
शहरी गरीब योजनेंतर्गत जी बिले दिली गेली आहेत ती जानेवारी-फेब्रुवारीमधीलही आहेत जेव्हा करोनाचा प्रादुर्भाव नव्हता. त्यामुळे यासाठीच 40-50 कोटी रुपये दिले गेले, असे म्हणता येणार नाही. अजूनही या योजनेंतर्गत महापालिकेने वर्गीकरणातून निधी उभारला आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
जम्बो कोविड सेंटरची घडी येत्या 15 दिवसांत पूर्णपणे बसेल, असा दावाही त्यांनी केला. त्याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले ऑक्सिजन प्लान्ट आणि अन्य गोष्टींची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिली. हॉस्पिटलच्या उभारणीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.