पिंपरी – ऑनलाइन अभ्यासामुळे सलग दोन वर्ष लेखन-वाचन विसरलेल्या महापालिका प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची आगामी शैक्षणिक वर्षात सलग दोन महिने दररोज एक तास उजळणी करून घेतली जाणार आहे. उपचारात्मक अध्ययन अध्यापन कार्यक्रमातंर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे.
करोनामुळे सलग दोन वर्ष शाळा बंद होत्या. त्या कालावधीत विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास घेण्यात आला. वाचन, लेखन आणि गणिती कौशल्यात अप्रगत राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर सलग 60 दिवस उपचारात्मक अध्ययन अध्यापन कार्यक्रम राबविण्यात
येणार आहे.
महापालिका शाळांमध्ये वाचन, लेखन आणि गणिती कौशल्यात अप्रगत राहिलेल्या मुलांची दररोज 1 तास उजळणी करून घेण्यात येणार आहे. दर 15 दिवसांनी त्यांच्या अभ्यासात काय सुधारणा झाली, याचे मुल्यमापन केले जाणार आहे. वाचन, लेखनात मुले कोठे कमी पडतात, याची चाचपणी करून त्यानुसार त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे. शब्दपट्ट्या, वाक्यपट्ट्या यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला जाणार आहे. इंग्रजीमधील विविध स्पेलींगचे पाठांतर करून घेण्यात येईल. कायम चुका होणाऱ्या शब्दांचा सराव करून घेण्यात येणार आहे.
वाचन, लेखन आणि गणिती कौशल्यात अपग्रत राहिलेल्या मुलांची शाळा सुरू झाल्यानंतर दररोज एक तास उजळणी करून घेण्यात येईल. उपचारात्मक अध्ययन अध्यापन कार्यक्रमातंर्गत ही कार्यवाही होणार आहे. सलग 60 दिवस हा उपक्रम राबविला जाईल.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग.